अश्रू आटलेल्या डोळ्यांमध्ये भयावह भवितव्याची चिंता ! ( Ground Zero Report)

रावेर शालीक महाजन । किनगाव जवळ झालेल्या अपघातात रावेर तालुक्यातील १५ जणांना प्राण गमवावा लागल्याच्या वेदना आज पहाटे पासूनच सर्व जण अनुभवत आहेत. दुपारी शोकाकुल वातावरणात सर्वाच्या पार्थिवावर अंत्यंस्कार झालेत. यावेळी काळीज पिळवटून काढणारा आक्रोश हा उपस्थितांना हेलावून गेला. तास-न-तास रडून यातील अनेकांच्या डोळ्यांमधील जणू काही अश्रू देखील आटले. मात्र त्यांच्या डोळ्यांमधील भयावह चिंता ही स्पष्टपणे दिसून आली. लाईव्ह ट्रेंडस न्यूजवर आम्ही जास्तीत जास्त व्हिडीओ देण्याचा प्रयत्न करतो. मात्र आजची घटना ही इतकी सुन्न करणारी आहे की, आम्ही यातील फक्त महत्वाच्या भागांचेच व्हिडीओ आपल्याला सादर केले. भल्या पहाटेपासून ते दिवसभर नेमके काय झाले याबाबतचा हा ग्राऊंड रिपोर्ट !

भल्या पहाटेच धडकली वार्ता

आज भल्या पहाटेच रावेर Raver तालुक्यातील १५ जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी येऊन धडकताच सर्वांना धक्का बसला. सकाळी लोकांचा दिवस सुरू होण्याआधीच आलेली ही वार्ता खोटी निघावी अशी प्रार्थना करत असतांनाच यातील मृतांचा तपशील समोर आला. यात आभोडा गावातील तब्बल ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या मृतांची नावे पाहिल्यानंतर काळीज पिळवटून टाकणारे सत्य समोर आले.

तीन कुटुंबांवर आघात

पोटाची खळगी भरण्यासाठी मजूरी करण्यासाठी परगावी गेलेले आभोडा येथील मोरे, वाघ व तडवी या तीन कुटुंबांवर काल रात्री काळाचा आघात झाला आहे. या अपघातात कोणाचा भाऊ गेला..कोणाचा मुलगा कोणाचा पती तर कोणाची पत्नी कायमची निघुन गेले आहे.

या भयंकर घटनेत आभोडा येथील सर्वाधीक दहा विवरे येथील दोन, केर्‍हाळा येथील एक तर रावेर शहरातील दोन असे एकूण १५ जण कायमचे निघुन गेले आहेत. यातील पाच जणांवर दफन विधी तर आठ मयत महिला व पुरुष यांना अग्निडाग देण्यात आला.

खुशी आणि दिपिकाच्या आयुष्यातील खुशी हरपली !

या अपघातात मोरे कुटुंबावर भयंकर आपत्ती कोसळली आहे. यात आई कमलाबाई मोरे (वय४५) यांच्यासह त्यांची मुलगी शारदा (वय १५) व मुलगा गणेश (वय ५) या तिघांचा मृत्यू झाला आहे. या कुटुंबात आता फक्त खुशी आणि दिपीका या अनुक्रमे तीन व चार वर्षांच्या बालिकाच उरल्या आहेत. पहाटे घरा जवळ गर्दी जमत असतांना खुशी व दिपिका माझी आई भाऊ कुठे आहे त्यांना बोलवा..आम्हाला कोण जेवन देईल ? कोन सांभाळील ? असे भावनिक होऊन त्या विचारत होत्या. मात्र कुणीही त्यांना उत्तर देऊ शकले नाही. रडून-रूडून अश्रू सुकल्यानंतर त्या दोन्ही अक्षरश: सुन्न झाल्याचे दिसून आले. भेटायला येणारे दोन दिवस सहानुभूती दाखवतील मात्र त्यांच्या आयुष्यातील खुशी ही आता कायमची हरपल्याची भेदक जाणीव मात्र सर्वांनाच झाली. यामुळे त्यांच्याकडे पाहून अनेकांना रडू आवरेनासे झाले होते.

वाघ कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

या अपघातात आभोडा येथील वाघ कुटुंब देखील मजूरीसाठी परगावी गेले होते. या कुटुंबातील अशोक वाघ (वय ४५); पत्नी संगीता वाघ (वय ३५); मुलगा सागर ( वय ३); बहीण सुमन इंगळे (वय ४५) आणि पुतण्या नरेंद्र वाघ (वय २५) हे देखील जागेच ठार झाले. यामुळे वाघ कुटुंबावर देखील काळाची झडप पडली आहे.

माता व पुत्र ठार

आज दुपारी मयांच्या पार्थिवावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यातील सबनूर हुसेन तडवी (वय ५३) आणि त्यांचा मुलगा दिलदार हुसेन तडवी वय २० वर्ष यांचा देखील मृत्यु झाला आहे. या दोघांचा दफनविधी करण्यात आला. काहींना दफन करण्यात आले तर काहींवर दाहसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी अनेकांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.

आभोड्यात एकही चुल पेटल नाही

आज सकाळ पासुन अपघाताची बातमी गावाला माहिती मिळताच गावात एकही चुल पेटल नाही. गावात सर्वदूर हळहळ व्यक्त होत होते. आजवरच्या इतिहासात गावामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर आपत्ती कधीच कोसळलेली नसल्याचे गावकरी आज अक्षरश: स्तब्ध झाल्याचे दिसून आले. तर दुर्गम भागात असणार्‍या या गावात या अपघातामुळे प्रशासकीय अधिकारी, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आज दिवसभर आले.

पालकमंत्र्यांनी घोषीत केली मदत

दरम्यान घटनेची माहीती वार्‍यासारखी पसरताच जिल्हाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आभोडा गावात भेट देऊन मयताच्या कुटुंबाचे सांत्वन केले. गावातुन थेट मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्याशी बोलून मयत गरीब मजूरांना मुख्यमंत्री साहयता निधितुन मदत करण्याची विनंती केली यात प्रत्येक मयत व्यक्तीच्या कुटुंबाना मयत प्रतिव्यक्ती दोन लाख रुपये मदत मिळणार आहे.

आमदार शिरीष चौधरी ठाण मांडून

आभोडा गावात आमदार शिरीष चौधरी यांनी देखील भेट देऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी बोलून अजुन त्यांना मदत करण्याची विनंती केली. अपघात झाल्यानंतर ते गावात अनेक तास ठाण मांडून होते. त्यांनी मृताच्या कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.

मान्यवरांनी दिल्या भेटी

घटनास्थळी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे, जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन, भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, निळे निशान सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर, प्रदीप सपकाळे राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख आदीनी घटनास्थळी भेट दिल्या.

भुसावळातून मागविल्या रूग्णवाहिका

यावल येथून आभोडा गावात दहा शव नेण्यासाठी भूसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी भूसावळ येथील रुग्णवाहिका बोलावून काही शव आभोडा गावात आणले. यावेळी स्वत: अनिल चौधरी देखील आभोडा गावात उपस्थितीत राहून मयत कुटुंबांचे सांत्वन करत होते.

गावात मजुरी हाच प्रमुख व्यवसाय

आभोडा गावात सध्या हाताला काम नसल्याने येथील महिला व पुरुष मजूरी करण्यासाठी बाहेरगावी जात असतात अनेकांच्या हाताला काम नसल्याने दोन ते चार दिवस बाहेर राहव लागते. काल रात्री झालेली दुर्घटना ही बाहेरगावी मजुरीसाठी गेल्यानेच घडल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच गावातील कोणीही मजूरी साठी बाहेरगावी गेले नाही तर शेतकरी शेतात गेलेले नव्हते.

अधिकारीही हेलावले

खरं तर अपघातासारख्या आपत्तीत प्रशासनाची भूमिका ही कर्तव्यकठोर या प्रकारातील असते. अर्थात, दु:खातून सावरून काम करावे लागते. मात्र आभोड्यातील भयंकर आपत्तीमुळे अनेक अधिकारी देखील भावूक झाल्याचे आज दिसून आले. नायब तहसिलदार सी. जी. पवार, पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे, गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी गावात भेट देऊन मयत मोरे वाघ व तडवी कुटुंबाचे सांत्वन केले. प्रशासनाकडून जास्तीत-जास्त मदत करणार असल्याचे सांगितले.

Protected Content