Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…अन् लाच मागणारा अधिकारीच सहकार्‍यांसह झाला गायब !

रावेर प्रतिनिधी | औरंगाबाद येथील कंत्राटदाराकडे अधिकार्‍याने देयकासाठी लाचेची मागणी केली. मात्र या संदर्भात अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती येताच संबंधीत अधिकारी आणि त्याचे सहकारी गायब झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

या संदर्भात माहिती अशी की, औरंगाबाद येथील एका कंत्राटदाराने रावेरात ऑनलाइन टेंडर भरून काम घेतले होते.या कामा संदर्भात रावेरातील एका विभागाच्या प्रमुख अधिकार्‍याने संबंधित ठेकेदाराला मोठ्या रक्कमेची लाचेची मागणी केली होती. पैशांच्या मागणीला ठेकेदार त्रस्त झालाने त्याने या अधिकार्‍याविरुद्ध लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.मात्र संबंधित अधिकार्‍याला याचा सुगावा लागला. तेव्हापासून अधिकारी गायब झाले आहे. दरम्यान वरिष्ठ अधिकार्‍यांनी तडकाफडकी त्यांच्या कडील चार्ज काढून घेतला असून यावलच्या अधिकार्‍यांकडे पुढील आदेश होईपर्यंत पदभार सोपविण्यात आला आहे.

एका शासकीय विभागाच्या कामाचे कंत्राट औरंगाबादच्या एका ठेकेदाराने घेतले होते. हे काम पूर्ण झाल्यावर या कामाचे बिल काढण्यासाठी संबंधित अधिकार्‍याने ठेकेदाराकडे मोठ्या रकमेच्या लाचेची मागणी केली होती. मात्र नियमानुसार व एस्टीमेट प्रमाणे काम पूर्ण केलेले असल्याने औरंगाबाद येथील ठेकेदाराने या अधिकार्‍याला पैसे देण्यास नकार दिला.कामाचे पैसे मिळत नसल्याने अखेर ठेकेदाराने मराठवाड्यात लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या अधिकार्‍यांविरुद्ध अँटी करप्शन ब्युरोने रावेरात येऊन सापळा लावला होता. याची कुणकुण लाच मागणार्‍या अधिकार्‍याला लागल्याने गेल्या आठ दिवसापासून हा अधिकारी , त्याचा वाहनचालक व एक सहकारी कर्मचारी असे तिघे जण गायब झाले आहेत. अधिकारी कर्मचार्‍यांसह गायब झाल्याने हा सापळा अयशस्वी झाला असला तरी संबंधित अधिकार्‍यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया लाच लुचपत विभागाकडून सुरु असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.या प्रकरणामुळे संबंधित अधिकार्‍याचा पदभार वरिष्ठ अधिकार्‍यांनी तडकाफडकी काढून घेतला असून यावलच्या अधिकार्‍यांकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात आला आहे.

Exit mobile version