Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : भाजपच्या वेबसाईटवर खा. रक्षा खडसेंचा आक्षेपार्ह उल्लेख !

जळगाव प्रतिनिधी । भाजपच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांचा पक्षाच्याच वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख असल्याचे ट्विट ख्यातनाम पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. याची दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकाराबाबत कार्यवाहीची मागणी केली आहे.

याबाबत वृत्त असे की, भारतीय जनता पक्षाची https://www.bjp.org ही अधिकृत वेबसाईट आहे. यावर पक्षाची इत्यंभूत माहिती देण्यात आलेली आहे. यात लोकसभा या विभागात भाजपच्या खासदारांची छायाचित्रांसह माहिती दिलेली आहे. यातील हिंदी पर्याय निवडल्यानंतर लोकसभा सदस्यांची यादी पाहिली असता रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या नावाचा आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आल्याचा गौप्यस्फोट ख्यातनाम पत्रकार तथा लेखीका स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विटच्या माध्यमातून केल्याने खळबळ उडाली. तर इंग्रजी वेबसाईटवर मात्र रक्षाताई खडसे यांचा व्यवस्थीत उल्लेख आढळून येत आहे.

स्वाती चतुर्वेदी यांच्या या ट्विटने खळबळ उडाली आहे. यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याचे संकेत मिळाले आहेत. तथापि, हा प्रकार गुगल ट्रान्सलेटच्या चुकीच्या अनुवादाने झाल्याचे काही युजर्सनी चतुर्वेदी यांना दाखवून दिले आहे. तर काहींनी यावरून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

या ट्विटची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेतली. त्यांनी लागोपाठ केलेल्या दोन ट्विटच्या माध्यमातून हा सर्व प्रकार अतिशय धक्कादायक असून महाराष्ट्रात महिलांचा अपमान खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र प्रदेश भाजपने यावर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्राचा सायबर सेल यावर कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Exit mobile version