Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अखेर खूनाला फुटली वाचा; सात जण अटकेत

रावेर प्रतिनिधी | महिला व तिच्या प्रियकराने इतरांच्या मदतीने केलेल्या व्यक्तीच्या खुनाची घटना उघड झाली असून या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, प्रताप खुमसिंग भील (वय ४६) हा व्यक्ती पंधरा दिवसांपासून गायब होता. त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. रावेर पोलिस ठाण्यात मिसिंगच्या गुन्हा दाखल झाल्यावर पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी वेगवेगळी पथके तयार करून तपास सुरू केला. यातून बेपत्ता झालेल्या प्रताप भील यांचा खून जाल्याचे उघडकीस आले. मृत प्रतापची पत्नी सागरीबाई भील हिला आरोपी लक्ष्मण वेरसिंग भील याने तीन वर्षापूर्वी पळवून नेले होते. तेव्हापासून त्यांच्यामध्ये वैमनस्य निर्माण झाले होते. त्यातूनच पंधरा दिवसांपूर्वी लक्ष्मण, सागरीबाई यांनी साथीदारांच्या मदतीने प्रतापला मारहाण करून तसेच गळा दाबून खून केला असल्याचे तपासात उघड झाले.

पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांनी एपीआय शीतलकुमार नाईक,उपनिरीक्षक मनोज वाघमारे आणि सहकार्‍यांसह कारवाई करत पाडळे आणि बर्‍हाणपूर येथून लक्ष्मण वेरसिंग भील, सागरीबाई लक्ष्मण भील, इस्माईल हसन तडवी, मेहबूब कासम तडवी, टाल्या शाहादा भील, जितेंद्र सुरमल भील, सुरमल छत्तरसिंग भील या सात आरोपींना अटक केली. त्यांना पोलीस खाक्या दाखविताच हा गुन्हा उघड झाला.

पंधरा दिवसांपूर्वी आरोपींनी प्रताप खुमसिंग भील याचा पाडळा खुर्द शिवारातील नागोरी नदी काठावरील मिराबाई गोविंदा चौधरी यांचे शेतात खून केला. त्यानंतर मृतदेह एका विहिरीत टाकून पलायन केले. मात्र, दोन-तीन दिवसांनी मृतदेह फुगून वर आला. त्यामुळे त्यांनी नागोरी नदीजवळ नाल्याच्या काठावर पुरला असल्याची माहिती पोलिसांना दिली. यानुसार शनिवारी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या उपस्थितीत जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढून जागेवरच शवविच्छेदन करून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Exit mobile version