Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जलयुक्त शिवारातील घोळ : आ. शिरीष चौधरी यांची लक्षवेधी

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आलेल्या कामांमध्ये घोळ झाला असून या संदर्भात आमदार शिरीष चौधरी यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्‍न उपस्थित केला आहे. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजने आधीच हा घोळ जगासमोर मांडला असून आता यावर विधानसभेत चर्चा झाल्याने याबाबत चौकशी होण्याचे संकेत मिळाले आहेत.

रावेर तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या निकृष्ट कामां बद्दल आमदार शिरीष चौधरी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडत चौकशीची मागणी केली आहे. तालुक्यात जलयक्त शिवार योजनेवर करोडो रुपये खर्च करून कोणताही लाभ झाला नसल्याचे यापूर्वी लाईव्ह ट्रेंडस न्युज’ने वारंवार वृत्त प्रसिध्द करत जनते समोर मांडले होते.

२०१५ ते २०१८ या तीन वर्षाच्या काळात ४१७ कामांवर तालुक्यात शासनाचे सुमारे साडे तेरा कोटी रुपये खर्ची पडले आहेत. मात्र कामे झालेल्या गावांच्या शिवारातील भूगर्भातील ना पाण्याचा टक्का वाढला ना टंचाई दूर झाली अशी स्थिती आहे.मग खर्च झालेले कोट्यवधी रुपये नेमके मुरले कुठे याची चौकशी करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
१९ गावात कामे तरीही टंचाईच

या योजनेंतर्गत तालुक्यातील १९ गावात नाला खोलीकरण व बांध, सिमेंट बंधारे बांधणे, जुन्या बंधार्‍यांची दुरुस्ती, साठवणी बंधारा, पाझर तलाव, शेततळे, मातीचे बंधारे अशी कामे करण्यात आली आहेत. कामे झालेल्या गावांपैकी बहुतांशी गावे आदिवासी भागातील आहेत. ही कामे तालुका कृषी कार्यालय, रावेर वन विभाग(प्रादेशिक), पाल वन्यजीव विभाग, जलसंधारण विभाग, जिल्हा परिषदेचा लघु सिंचन विभागाने केलेली आहेत.

४१७ कामांवर १३ कोटी खर्च

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत १९ गावांमध्ये २०१५ ते २०१८ या कालावधीत एकूण ४१७ कामे करण्यात आली आहेत. या कामांवर १३ कोटी ४४ लाख २५ हजार ७७ रुपये खर्च झाले आहेत. याच काळात सन २०१५-१६ मध्ये १०४ टक्के, २०१६-१७ मध्ये १०५ टक्के, २०१७-१८ मध्ये ९७ टक्के, तर २०१८-१९ मध्ये ७१ टक्के पाऊस झालेला आहे. २०१८-१९ वर्ष वगळता तालुक्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. असे असतानाही कामे झालेल्या गावांच्या भूगर्भातील पाणी पातळीत मात्र वाढ झालेली नसल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.

तत्कालिन अधिकारी चौकशीच्या रडारवर

जलयुक्त शिवार योजनेवर काम करणारे रावेर तालुक्यातील तत्कालिन अधिकार्‍यांच्या दुर्लक्षणामुळे कामे निकृष्ट झाल्याची ओरड असुन आदिवासी पट्यातील सर्व साधारण जनतेच्या आवाज म्हणून लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने वृत्त प्रसिध्द करत लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधले होते.या निकृष्ट कामांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी होत आहे.त्यामुळे तात्कालिन अधिकारी चौकशीच्या रडारवर आहे.

Exit mobile version