Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एमआयएमची ऑफर राऊतांनी नाकारली !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एमआयएमने महाविकास आघाडीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी औरंगजेबाच्या कबरीसमोर गुढगे टेकणाऱ्‍यां सोबत आपण आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

एमआयएमचे नेते इम्तीयाज जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळातील कुतुहल चाळवले असून यावरून आता विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी यावर आपले मत प्रदर्शीत केले आहे.

संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना एमआयएमसोबत उघड किंवा छुपी हातमिळवणी होऊ शकत नाही हे स्पष्ट केले आहे. याबाबत ते म्हणाले की, महाराष्ट्रात तीन पक्षांचेच सरकार आहे आणि तेच राहील. यात चौथा कोण पाचवा कोण यामध्ये तुम्ही कशाला पडला? शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विचारांनी चालणारे पक्ष आहेत. हेच आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या पुढे कबरीपुढे जाऊन गुढघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श आहे ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाही.

राऊत पुढे म्हणाले की, एमआयएम आणि भाजपाची छुपी युती आहे हे तुम्ही उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये पाहिलेले आहे. जे आधीच भाजपाबरोबर छुप्या युतीमध्ये काम करत आहेत त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध येऊ शकत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

 

Exit mobile version