Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हार्ट ऑफ गोल्ड : कोविड पोझिटिव्ह रुग्णांना सेवा देणारा धाडसी अवलिया दीपक परदेशी…!

जळगाव । येथील भरारी फाऊंडेशनचे संस्थापक दीपक परदेशी यांनी कोरोनाच्या आपत्तीत केलेली सेवा ही अतिशय कौतुकास्पद अशीच आहे. विशेष करून घरात बाळंतीण पत्नी व बाळ असतांनाही त्यांनी दाखविलेले धाडस हे अतिशय लोकविलक्षण या प्रकारातील आहे.

घरात नुकतच जन्मलेलं बाळ व ओली बाळंतीण पत्नी असताना कोविड पोझिटिव्ह रुग्णांना सेवा देणारा धाडसी अवलिया दीपक परदेशी…!

भरारी फाऊंडेशन या आपल्या संस्थेच्या माध्यमातून या तरुणाने लॉकडाऊनच्या काळात शेकडो गरजू कुटुंबाची चूल पेटती ठेवली. महिनाभर पुरेल इतकं राशन वाडया- वस्त्यांमध्ये जाऊन वाटप केलं.

पेशंटची संख्या जसजशी वाढायला लागली तशी या संवेदनशील तरुणाने एक धाडसी निर्णय घेतला. जळगावच्या राजे संभाजी नाट्यगृहात ५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू केले. दवाखान्यात घेतली जाते तशा यंत्रणेसह संपूर्ण काळजी घेत हे कोविड सेंटर उभारण्यासाठी दीपक परदेशी यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.

पिंप्राळा येथील एका भरलेल्या घरातील कर्ता माणूस बाधित झाला. रात्रीतून अवस्था खराब होऊन पहाटेच प्राणज्योत मावळली. या परिवारातील संपूर्ण कुटुंबाची कोविड टेस्ट पोसिटिव्ह आली. त्यामध्ये ९० वर्षाच्या आजीबाईंपासून ९ वर्षांच्या मुलापर्यंतचे १० जण बाधित झाले. संपूर्ण परिवारच भयग्रस्त झाला. घरातील उमदा माणूस गेला आणि संपूर्ण परिवारावर संकट चालून आलं.अशा परिवाराला दिपकने संवेदना दाखवून सोबत आणले. त्यांच्या स्वयंसेवकांसह सुश्रुषा केली. मनातील भीती काढून त्यांची व्यवस्थित काळजी घेतली. याचा परिणाम म्हणजे ९ वर्षाच्या मुलासह सगळा परिवार सुखरूप घरी परतला.

जळगावातील एक उमदा छायाचित्रकार तरुण त्याच्या रशियन पत्नीसह कोविड पोझिटिव्ह निघाला.वडील कोरोनाने गेले. अशा दुःखात त्याची मानसिकता सांभाळत धीर देऊन सेवा दिली. स्मशाभूमीतील पित्याचा जीव मत्याच्यापर्यंत आणून तर्पण केले.

एका रुग्णाचे वडील वारले. त्यांचा बी. पी. वाढून चुकीचे काही होऊ नये म्हणून दोन तास पॉझिटिव्ह रुग्णाजवळ थांबून त्यांची काळजी घेतली.

हे सगळं सुरू असताना दिपकची पत्नी बाळंतीण झाली, त्यात बाळाला काविळ झाला. इकडे रुग्णसेवा व तिकडे बायको एका दवाखान्यात आणि नवजात शिशु दुसर्‍या दवाखान्यात. बाळाला दुध पाजण्यासाठी बायकोला दोन दवाखान्यात जाणं अशी तारेवरची कसरत सुरू होती. पण त्याची ही कृती अनेकांना प्रेरणा देत होती. त्याच्यासोबत त्याच्या सारखे अनेक हात रुग्णसेवेसाठी याच गोष्टीमुळे पुढे येत होते.

अशा धाडसी युवकाला आम्ही मनाचा मुजरा करतो.

( अशाच प्रकारे कोरोनाच्या प्रतिकारासाठी झटणार्‍या कोरोना योध्द्यांना जळगावातील ख्यातनाम अशा रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सतर्फे हार्ट ऑफ गोल्ड या मालिकेच्या माध्यमातून वंदन केले जात आहे. ही मालिका आपण लाईव्ह ट्रेंडस न्यूजवरून देखील वाचू शकतात. )

अधिक माहितीसाठी

फेसबुक पेज : https://www.facebook.com/RCBafnaJewellers

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/rcb_jewellers

Exit mobile version