Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राफेलची पहिली तुकडी भारताकडे येण्यासाठी रवाना

नवी दिल्ली वृत्तसंस्था । बहुप्रतिक्षीत आणि प्रचंड वादास कारणीभूत ठरलेल्या राफेल विमानांची पहिली तुकडी फ्रान्सहून भारताकडे येण्यासाठी निघाली आहे. लवकरच या विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश होणार आहे.

२०१६ साली भारताने फ्रान्स सरकार बरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा ५९ हजार कोटींचा करार केला आहे. यावरून बरेच राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, राफेल फायटर विमानांच्या पहिल्या तुकडीने फ्रान्समधून उड्डाण केले असून या तुकडीत एकूण पाच विमाने आहेत. ही तुकडी २९ जुलै रोजी भारतात लँडिंग करतील. राफेल फायटर जेटच्या हाताळणीसाठी भारतीय हवाई दलाचे बारा वैमानिक आणि इंजिनिअरींग क्रूला पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात आले आहे. उड्डाणवस्थेत असतानाच या विमानांमध्ये इंधन भरण्यात येईल. हरयाणामधील अंबाला एअर फोर्स स्टेशनवर या राफेल विमानांचा तळ असेल.

येथेे येण्यापूर्वी ही विमाने यूएईमधील फ्रेंच तळावर लँडींग करतील. दरम्यान, २० ऑगस्टला पारंपारिक पद्धतीने सोहळा आयोजित करुन या फायटर विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात येईल अशी शक्यता आहे. राफेलचे पहिले स्क्वाड्रन अंबाला एअर बेसवर तर दुसरे स्क्वाड्रन पश्‍चिम बंगाल हाशिमारा येथे असेल. भारताला मिळणारी राफेल फायटर विमाने मिटिओर आणि स्काल्प अशा मिसाइल्सनी सुसज्ज असतील. यामुळे शत्रुच्या प्रदेशात खोलवर अचूक हल्ला करण्याची भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे.

Exit mobile version