Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रामाचे कार्य होणारच : सरसंघचालक मोहन भागवत

mohan bhagwat

 

उदयपूर (वृत्तसंस्था) केंद्रात भाजपला स्वबळावर सत्ता मिळाल्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राम मंदिर पूर्ण होण्याची आशा आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी तशा प्रकारचे संकेत दिले आहेत. रामाचे कार्य सगळ्यांनी मिळून करायचे आहे आणि ते होणारच, असा विश्वास भागवतांनी उदयपूरमध्ये आयोजित रामकथा कार्यक्रमात व्यक्त केला.

 

उदयपूर येथे आयोजित संघ शिक्षा वर्ग प्रशिक्षणादरम्यान मोहन भागवत यांनी बोलताना रामाचं काम करायचे आहे आणि रामाचे काम होणारच असा विश्वास व्यक्त केला. ‘रामाचे काम करायचे आहे म्हणजेच आपले काम करायचे आहे. आपले काम आपण स्वत: केले तर ठीक, दुसऱ्याकडे सोपवले तर कोणाला तरी लक्ष ठेवावे लागते’, असे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, भाजपने पुन्हा एकदा बहुमताने सत्ता प्राप्त केली आहे. या पार्श्वभूमीवर भागवत यांनी केलेल्या या वक्तव्याला अधिक महत्त्व आले आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात राम मंदिर-बाबरी मशीद हा खटला प्रलंबित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यायालयाचा अंतिम निर्णय आल्याशिवाय राम मंदिरसाठी अध्यादेश काढता येणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र, आता परिस्थिती बदलली असून सरसंघचालकांच्या वक्तव्यानंतर मोदी सरकार आपल्या भूमिकेत बदल करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version