दूध संघात अलीबाबा व चाळीस चोरांची टोळी- राजू शेट्टीचा घणाघात

बारामती। दूध संघ सरकारी तिजोरीवर दरोडा टाकत आहेत सरकारमधील अलिबाबा आणि चाळीस चोरांची टोळी त्यात सामील आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. ते आजच्या दूध आंदोलनात बोलत होते.

दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान सरकारने द्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बारामती येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. पंचवीस रुपयांहून अधिक दराने दूध संघांकडून सरकार दूध खरेदी करत आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांना मात्र १७ ते १८ रुपये प्रति लिटर दिले जात आहेत. दूधसंघ व सरकार कागदी मेळ घालत आहेत . दुधाचे दर सातत्याने घटत चालले आहेत त्यामुळे गेली तीन वर्षात दूध उत्पादनावर देखील परिणाम झाला असल्याचे शेट्टी म्हणाले.

दरम्यान, ४० टक्केहून अधिक दूध उत्पादन घटले आहे. असे असताना दुधाचे भाव वाढणे अपेक्षित आहे मात्र सातत्याने भाव कमी होत आहेत. याला राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका करून प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यावर सरकारने जमा करावेत अशी मागणी यावेळी राजू शेट्टी यांनी यावेळी केली. दूध संघ राज्यातील शेतकर्‍यांना लुटत असून सरकारमधील मंत्री यांची टोळी देखील त्यात सामील आहे. मुख्यमंत्र्यांनी मातोश्री बाहेर पडून राज्यात काय चाललं आहे याकडे लक्ष द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील शेट्टी यांनी यावेळी दिला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाठक, अमरसिंह कदम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनात दुग्ध उत्पादक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Protected Content