Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात ‘जुनून’ या स्वागत समारंभाचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी | रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात ‘जुनून’ या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अभ्यासप्रक्रिया, करियरच्या संधी, शिक्षण संस्था, प्रवेश प्रक्रिया याबाबत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात आले.

“सध्याच्या युगात इंटरनेट व डिजिटल मीडिया आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. ‘संभाषण चातुर्य’ हे विशेष कौशल्य सध्या खूप महत्त्वाचे झाले आहे. आजच्या जगात प्रभावी संभाषण हेच प्रगतीचे उत्तम साधन आहे. सूत्रसंचालन-निवेदन, व्यावसायिक वक्ता, मॅनेजमेंट व मोटिव्हेशनल प्रशिक्षक या विविध करिअरची भुरळ अनेकांना सध्या पडते आहे. तसेच करिअर निवडताना येणारा ताण, पालकांच्या अपेक्षांचे ओझे, त्यात कमी मार्कांमुळे असलेली निराशा व डळमळीत आत्मविश्वास यावर उपस्थित विद्यार्थ्यांना “जुनून” असणारी माणसंच खरी क्रांती घडवू शकतात” असे मनोगत गेली १० ते १२ वर्षे उद्योग क्षेत्रात काम करणारे तरुण वक्ते, प्रशिक्षक व सेलिब्रिटी स्कूलचे संचालक सिद्धार्थ प्रभाकर यांनी जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयामधील प्रथम वर्ष एमबीए व एमसीए या विभागाच्या इंडक्शन कार्यक्रमावेळी व्यक्त केले.

याप्रसंगी रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ.प्रिती अग्रवाल व इस्टीट्यूटचे अॅकेडमिक डीन प्रा.डॉ.प्रणव चरखा, एमबीए विभागप्रमुख प्रा.मकरंद वाठ, एमसीए विभागप्रमुख प्रा.रफिक शेख हे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा.डॉ.अग्रवाल यांनी आपल्या प्रास्ताविकेत नमूद केले की, “करिअरच्या ठरलेल्या वाटांसोबतच वेगळ्या चाकोरी मोडणाऱ्या नवीन वाटांची ओळखही या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना होईल. आपली आवड व क्षमता या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन करिअरची योग्य निवड कशी करावी ? करिअरच्या अवघड टप्प्यांवर कोणत्या गोष्टींचा विचार करावा ? या विषयांवर करिअर समुपदेशक सिद्धार्थ प्रभाकर हे उपस्थित विदयार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मनातील प्रश्न सोडवतील”

आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात सिद्धार्थ प्रभाकर पुढे म्हणाले की, “आपल्याला करीयर घडवायचे असेल आणि नाव कमवायचे असेल तर सर्वात आधी मनातला न्यूनगंड काढून टाकला पाहिजे. आपण इतरांपेक्षा कमी आहोत, ही भावना काढून टाका. मध्यमवर्गीय घरातल्या विद्यार्थ्यांना परिस्थितीने पैलू पाडलेले असतात. संकटांना सामोरे जाण्याची कणखर मानसिकता असते. त्यामुळे या स्पर्धेच्या युगातही तुम्ही जगण्याच्या लढाईत इतरांपेक्षा काकणभर सरस असता. शिक्षण असो अथवा अन्य कोणतेही क्षेत्र त्यात यशस्वी होण्यासाठी सुरुवातीपासूनच पाया पक्का ठेवा, फोकस करा.” असे आवाहन त्यांनी केले.

अभ्यास कसा करावा यापासून ते कोणकोणत्या क्षेत्रात करियर करता येईल, त्यासंदर्भातील शिक्षण संस्था, प्रवेश प्रक्रिया याबाबत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राहुल त्रिवेदी व आभार प्रदर्शन प्रा.ज्योती जाखेटे यांनी केले. यावेळी प्रा.कल्याणी नेवे, प्रा.प्रशांत देशमुख यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Exit mobile version