Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा उद्रेक (व्हिडीओ)

pachora news 1

पाचोरा प्रतिनिधी ।  मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालेले असतांनाच मध्य रेल्वेच्या वाहतुकीचाही मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला आहे.  येथे तब्बल पाच तास उभ्या करण्यात आलेल्या एक्सप्रेसमधील प्रवाशांनी संतप्त होत रास्ता रोको आंदोलन केले.

याबाबत वृत्त असे की, गोरखपूर येथून दि.१ जुलै रोजी दुपारी २.०० वाजेच्या सुमारास निघालेली गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस ही विशेष उन्हाळी गाडी पहाटे ४.०० वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली. मात्र सकाळी ९.०० वाजले तरी गाडी पुढे रवाना होत नसल्याने प्रवाशी आक्रमक झाले. त्यातच संपूर्ण वातानुकूलित गाडीचे ए.सी.बंद करून ठेवण्यात आल्याने प्रवाशी हैराण झाले होते. काहीवेळात ही गाडी येथेच रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्याने प्रवाशांच्या संतापात भर पडली. त्यांनी रेल्वे रुळावर उतरून रेल्वे प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत रेल रोको आंदोलनास सुरुवात केली. यावेळी पाचोरा स्थानकात अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक रोखून धरण्यात आली होती. यात डाउन मार्गावरील माल वाहतूक गाडी तर अप मार्गावरील जम्मू-तावी -पुणे झेलम एक्सप्रेस गाड्या त्यांनी थांबवून धरल्या. दुसरीकडे स्थानिक स्टेशन मास्तर सुधाकर जाधव यांनी सातत्याने मुख्यालयाशी संपर्क साधत त्यांना घटनेची माहिती देत गाडी पुढे मार्गस्थ करण्याची विनंती केली. अखेर सकाळी १०.३० च्या सुमारास भुसावळ रेल्वे प्रशासनाने गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस ही विशेष गाडी पुढे नासिकपर्यंत जाणार असल्याचे जाहीर केल्याने जाहीर केल्याने प्रवाश्यांनी आंदोलन मागे घेतले. त्यानुसार गाडी मार्गस्थ झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Exit mobile version