अवैध सावकारीच्या विरोधात छापेमारी !

मुक्ताईनगर/बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अवैध सावकारीच्या विरोधात सहकार खात्याच्या पथकाने मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यात छापेमारी करून कागदपत्रे जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.

सहकार खात्याच्या पथकाने शुक्रवारी दिवसभर मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यात छापेमारी केली. अवैध सावकारीच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी साडेनऊ पासून सुरू झालेली ही कारवाई सायंकाळपर्यंत चालूच होती. यात पथकाने काही महत्वाची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती देण्यात आली आहे.

या कारवाईच्या अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा काकोडा येथील संदीपकुमार शामसुंदर खंडेलवाल, राजकुमार रामकुमार खंडेलवाल, बळीराम चांगो महाजन, प्रतीक रामनिवास खंडेलवाल, आणि हरी किसन भोई व सालबर्डी येथील प्रदीप बढे यांच्याकडे झाडाझडती घेण्यात आली. तर बोदवड येथील वसंत खाचणे आणि कैलास गोपीचंद आहुजा यांच्याकडेही सहकार खात्याच्या पथकाने कसून तपासणी केली.

या पथकात सहकार खात्याच्या अधिकार्‍यांचा समावेश होता. यात चोपडा येथील एस.एफ. गायकवाड, जामनेरचेजे.बी. बारी, अमळनेरचे के.पी. पाटील, एरंडोलचे जी.एच. पाटील मुक्ताईनगरचे मंगेशकुमार शहा, भडगावचे महेश कासार, चाळीसगावचे चंद्रकांत पवार आणि एन.के. सूर्यवंशी पाचोरा या अधिकार्‍यांचा समावेश होता. या छाप्यातून महत्वाचे पुरावे हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली असून यावरून आता नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content