Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यातील ‘या’ गावांमध्ये उभारले जाणार पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर सामाजिक सभागृह !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने राज्यातील ५० गावांमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ भव्य व सुसज्ज सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता देण्यात आली असून यात जळगाव जिल्ह्यातील गावांचाही समावेश आहे.

नुकत्याच झालेल्या बैठकीत ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी सदर ५० गावाच्या प्रस्तावास मान्यता दिली . या माध्यमातून जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, जालना, नंदुरबार पुणे, नांदेड, यवतमाळ, रत्नागिरी, सातारा, सिंधूदुर्ग, चंद्रपूर, अमरावती, नागपूर, आदी जिल्ह्यांतील गावांची निवड करण्यात आली असून लवकरच बांधकाम करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याची माहितीही ना. महाजन यांनी दिली.

दरम्यान, या गावांमध्ये जळगाव जिल्ह्यातील गावांचाही समावेश आहे. यात जामनेर तालुक्यातील पहूरपेठ,वाकोद व पहुरकसबे, पाचोरा तालुक्यातील लोहारा व कुर्‍हाड, जळगाव तालुक्यातील म्हसावद, रावेर तालुक्यातील अहिरवाडी, बोदवड तालुक्यातील शिरसाळा, चोपडा तालुक्यातील चहार्डी तर धरणगाव तालुक्यातील पाळधी या गावांचा समावेश आहे.

दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ बांधण्यात येणार्‍या सामाजिक सभागृहासाठी निवडण्यात आलेल्या गावातील ग्रामपंचायतींच्या वतीने सभागृह बांधण्यासाठी जागेची उपलब्धता करून देण्यात देण्यात येणार असून सुसज्ज असे ५० सामाजिक सभागृह बांधण्यात येणार आहेत .या माध्यमातून धनगर तसेच भटके विमुक्त जाती जमातीच्या लोकांसाठी सभागृहातच्या माध्यमातून सामाजिक तसेच शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

Exit mobile version