Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माळी समाजाच्या वधू-वर पालक परिचय पुस्तिकेचे प्रकाशन

जळगाव प्रतिनिधी | जळगावातील श्री संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठान व समस्त माळी समाज पंचमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वधू वर पालक परिचय पुस्तिके’चे विमोचन करण्यात येऊन ही परिचय पुस्तिका समाजबांधवांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

येथील श्री संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठान व समस्त माळी समाज पंचमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वधू वर पालक परिचय पुस्तिके’चे विमोचन रविवार, दि.३० जानेवारी रोजी करण्यात आले. ही परिचय पुस्तिका समाजबांधवांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

माळी समाजातील उपवर वधू-वरांसाठी दरवर्षी विवाह परिचय मेळावा आयोजित केला जातो. यंदा मात्र कोरोना महामारीमुळे मेळावा आयोजित झाला नाही. मात्र वधू-वर पालक ‘परिचय पुस्तिका २०२२’चे प्रकाशन करण्यात आले आहे. या पुस्तिकेचे विमोचन करण्यासाठी रविवारी दि.३० जानेवारी रोजी मोजक्या समाजबांधवांच्या उपस्थितीत छत्रपती शाहू महाराज संकुल येथे कार्यक्रम झाला. यंदाचे हे दहावे वर्ष आहे.

यावेळी श्री संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय भास्कर महाजन, उपाध्यक्ष जयंत इंगळे, सचिव शरद मोरे उपस्थित होते. अध्यक्ष विजय महाजन म्हणाले की, “काळाची गरज ओळखून समाजातील वर-वधूंची माहिती व्हावी तसेच वर-वधू संशोधनाला सहकार्य मिळावे यासाठी परिचय पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. पालकांनी सामंजस्याने व सकारात्मक बोलणी करून विवाह ठरवावेत.” असे आवाहनही त्यांनी केले.

वर-वधू पालक परिचय पुस्तिकेमध्ये महाराष्ट्रातील वधू-वरांची माहिती संकलित करून देण्यात आली आहे. तसेच माहिती परिपूर्ण मिळावी या दृष्टिकोनातून मांडणी करण्यात आली आहे. परिचय पुस्तिका मिळण्यासाठी शरद क्रिएशन, गोलाणी मार्केट या ठिकाणी संपर्क साधावा, अशी माहिती यावेळी सचिव शरद मोरे यांनी दिली. प्रसंगी खजिनदार विवेक महाजन, संचालक प्रकाश साबळे, गोपाळ चौधरी, सोमनाथ महाजन, डी.बी. महाजन, वामन महाजन, वसंत बिरारी, दिलीप माळी आदी समाज बांधव उपस्थित होते.

Exit mobile version