Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बालभारतीच्या नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि प्रशासन कोश, ऐतिहासिक बोधपर कथामालेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बालभारतीतर्फे पाठ्यत्तर प्रकाशित करण्यात आलेल्या इयत्ता तिसरी ते बारावीच्या नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि प्रशासन पाठ्यपुस्तकातील संकल्पना सोप्या भाषेत सचित्र उदाहरणासह स्पष्ट करण्यासाठी कोश आणि ऐतिहासिक बोधपर कथामालेच्या तीन भागांचे प्रकाशन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या या प्रकाशन कार्यक्रमास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

ऐतिहासिक घटनांच्या साखळीमागील ‍कार्यकारण संबंध समजणे, घटनांचे विश्लेषण वस्तूनिष्ठपणे करणे, विषयाची समज व आवड निर्माण करणे या गोष्टींची जाणीव ठेवून हे ऐतिहासिक कथामालेचे तीनही भाग वाचक, विद्यार्थी मित्र, शिक्षक व पालक यांच्यासाठी तयार केले आहेत.

कथामालेच्या भाग एकमध्ये प्राचीन कालखंड, दोन मध्ये मध्ययुगीन आणि तीन मध्ये आधुनिक कालखंड अशा सचित्र कथा आहेत. वाचन संस्कृती वृद्धीगंत होण्यासाठी कथामालांचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. इतिहास विषय समितीच्या अध्यक्षपदी डॉ. शुभांगना अत्रे, सदस्य सचिव वर्षा सरोदे आहेत.

नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि प्रशासन या विषयांच्या पाठ्यपुस्तकातील संज्ञा, संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्यात यासाठी संदर्भसाहित्य उपलब्ध व्हावे त्यातून अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया प्रभावी व्हावी यासाठी नागरिकशास्त्र आणि प्रशासन कोश तयार करण्यात आला आहे. नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि प्रशासन कोश विषय समितीच्या अध्यक्ष डॉ. गौरी कोपर्डेकर आहेत.

Exit mobile version