Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा वार्षिक योजनेतील कामांमध्ये लोकोपयोगी कामांचा समावेश करावा : जिल्हाधिकारी

a2b72136 152b 43e2 b97d 26f728162fb2

 

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सन 2019-20 मध्ये विविध कार्यान्वियीन यंत्रणामार्फत हाती घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये लोकोपयोगी योजना व उपक्रमांचा प्राधान्याने समावेश करावा. तसेच करण्यात येणाऱ्या कामांच्या याद्या जिल्हा नियोजन कार्यालयास तातडीने सादर कराव्यात. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिलेत.

 

जिल्हा वार्षिक योजनेबाबतचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जळगाव विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांचेसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

 

यावेळी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेतुन ज्या यंत्रणांना निधी प्राप्त होतो. त्यांनी या निधीतून कामांचे नियोजन करतांना लोकोपयोगी योजनांचा जास्तीत जास्त समावेश करुन जनतेच्या हिताची कामे होईल यावर भर द्यावा. तसेच आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेता आचारसंहिता लागण्यापूर्वी नवीन कामांना जून अखेरपर्यंत प्रशासकीय मान्यता घेऊन काम पूर्ण करावे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या ज्या विभागांकडे सन 2015-16 पासून अखर्चित निधी आहे. त्याची माहिती संबंधितांनी तातडीने सादर करावी. अन्यथा त्यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिला.

 

जिल्हा वार्षिक योजनेतून (सर्वसाधारण) सन 2019-20 अंतर्गत 308 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतुद मंजूर असून 102 कोटी रुपये इतका निधी अर्थसंकल्पीय प्रणालीवर प्राप्त झाला आहे. ज्या विभागांच्या कामांच्या याद्या प्राप्त होतील. त्यांना प्राधान्याने निधीचे वाटप करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सन 2018-19 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून (सर्वसाधारण) जिल्हा परिषदेकडील योजनांसाठी अर्थसंकल्पीय प्रणालीवर शिल्लक असलेला निधी आहरीत करुन ठेवण्यात आला आहे. त्या योजनानिहाय व कामनिहाय याद्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने जिल्हा नियोजन समितीस सादर कराव्यात व त्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता घेऊन कामांवर निधी खर्च करावा. त्याचबरोबर वितरीत करण्यात आलेला निधी कोणत्या कामांवर खर्च करण्यात आला याची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देशही डॉ. ढाकणे यांनी बैठकीत दिले.

Exit mobile version