Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शासकीय रुग्णालयाच्या आवारात जनसंपर्क कक्षाला सुरुवात

जळगाव प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी दि. ३ जानेवारी जनसंपर्क कक्ष सुरु करण्यात आला आहे. तसेच, रुग्णालय व महाविद्यालयाच्या आवारात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क घालणे सक्तीचे करण्यात आले असून लवकरच दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पदभार घेतल्यानंतर सुधारणांना सुरुवात केली आहे. तीन महिन्यांपूर्वी बंद झालेला जनसंपर्क कक्ष सोमवारी दि. ३ जानेवारी सुरु करण्यात आला. सोमवारी ओपीडीमध्ये विविध आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्णांनी गर्दी केली होती. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जिल्ह्यातून शेकडो नागरिक वैद्यकीय सेवा घेण्यासाठी दररोज येत आहेत. रुग्णालयाच्या आवारात मुख्य गेट क्र. १ समोर केसपेपरच्या विभागाची सुविधा केल्यामुळे गर्दी नियंत्रित राहून रुग्णांसह नातेवाईक सुखावले आहेत. तसेच, परिसरातच मध्यवर्ती ठिकाणी उभारलेल्या जनसंपर्क कक्षातून नागरिक, दाखल रुग्णांच्या नातेवाईकांना योग्य माहिती मिळत असल्याने हेलपाट्या कमी झाल्या आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावच्या माध्यमातून जनतेला उत्तम आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे हा उद्देश ठेऊन प्रशासन काम करीत आहे. जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून रोज अभिप्राय घेऊन बदल केले जाणार आहे. तसेच केसपेपर काढण्यासाठी महिला व पुरुषांची वेगळी रांग आणि कायदेशीर प्रकरणासाठी (एमएलसी) तिसरी खिडकी सुरु झाली आहे. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांचा वेळ वाचत आहे. तसेच रुग्णांसह नातेवाईकांना, नागरिकांना माहिती देण्यासाठी आवारातच जनसंपर्क कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. येथे नातेवाईकांना रुग्णाची माहिती मिळणे, ओपीडी, योजनांविषयी, रुग्णालय व महाविद्यालयातील सोयीसुविधांविषयी माहिती दिली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या, रुग्णांसह नातेवाईकांच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. रुग्णालय अद्ययावत होत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

 

Exit mobile version