Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत निषेध

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी समस्त पत्रकार बांधवांबद्दल केलेले विधान हे पत्रकारांच्या जिव्हारी लागले असुन त्यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे २७ सप्टेंबर रोजी पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासुन ते प्रांताधिकारी कार्यालया पर्यंत चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच निषेधार्थ निवेदन प्रांताधिकारी भुषण अहिरे व पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना देण्यात आले.

सदरचे निवेदन पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, राहुल मोरे यांनी स्विकारले. प्रतिकात्मक अंत्ययात्रा व निवेदन देते प्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाखडा, विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, पाचोरा तालुकाध्यक्ष नंदकुमार शेलकर, शहर अध्यक्ष प्रविण ब्राम्हणे, पत्रकार विनायक दिवटे, संदिप केदार, सचिन गोसावी, प्रविण बोरसे, दिलीप जैन, विजय पाटील, शांताराम चौधरी, अनिल येवले, योगेश पाटील, भुवनेश दुसाने, निखिल मोर, राहुल महाजन, दिलीप परदेशी, गजानन गिरी, किरण अहिरे, राकेश सुतार, भिकन पाटील यांचेसह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते‌.

या निषेधास उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना, महिला आघाडी, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष जिभाऊ पाटील, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विशाल बागुल, महासचिव दिपक परदेशी यांचेसह विविध सामाजिक व राजकीय पक्षांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे.

भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडत पत्रकारांसंदर्भात बदनामी व अवमानकारक वक्तव्य केले. “चांगल्या बातम्या छापून आणायच्या असतील तर पत्रकारांना चहा पाजा, त्यांना ढाब्यावर न्या” हे  चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या पत्रकारितेला बदनाम करणारे असून त्यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे तीव्र निषेध नोंदवत त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा शहरातुन काढण्यात आली.

चंद्रशेखर बावनकुळे यांचे हे वक्तव्य पत्रकारांवरील शाब्दिक हल्ला असल्याने पत्रकारांवरील हल्ले या गुन्ह्याखाली त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून अशी वक्तव्य करण्याचे धाडस कोणी करणार नाही. अशा आषयाचे निवेदन प्रांताधिकारी भुषण अहिरे व पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना देण्यात आले आहे. सदरचे निवेदन पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे व राहुल मोरे यांनी स्विकारले.

Exit mobile version