Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यातील सर्व धर्माच्या नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपूर (वृत्तसंस्था) सुधारीत नागरिकत्व कायद्याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज मनात बाळगू नये. राज्यातील कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या हक्काला राज्य शासन धक्का लागू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, सुधारीत नागरिकत्व कायदा मंजूर झाल्यानंतर देशात अशांतता, भिती आणि गैरसमजाचे वातावरण आहे. देशभरात या कायद्याविरोधात आंदोलने होत असून आंदोलनादरम्यान काही ठिकाणी हिंसाचार होत आहे. अशावेळी सर्वांनी मिळून जनतेच्या मनातील गैरसमज दूर करण्याची गरज आहे. स्वत: मुख्यमंत्री म्हणून आपण कायदा व सुव्यवस्थेबाबत विविध घटकांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात कायद्याबाबत चर्चा व्हायची आहे. त्यामुळे नागरिकांनी मनात भिती बाळगू नये. कायद्याला विरोध करण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करीत निवेदन द्यावे. त्याबाबत आपण संबंधितांशी चर्चा करण्यास तयार आहोत. आंदोलानात हिंसाचाराचा मार्ग न अवलंबता राज्याच्या लौकीकास धक्का लागू नये याची दक्षता घ्यावी. लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील जनतेला शांतता बाळगण्याबाबत आवाहन करावे, असेही श्री.ठाकरे म्हणाले.

Exit mobile version