Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घनकचरा प्रकल्प अन बायोमायनिंगचे प्रस्ताव मनपा स्थायी सभेत बहुमताने मंजूर

jalgaon 1

जळगाव, प्रतिनिधी | आव्हाणी शिवारात नवा घनकचरा प्रकल्प उभारणे तसेच साचलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग करण्याचे प्रस्ताव गेल्या स्थायी सभेत स्थगित ठेवले होते. या दोन्ही प्रस्तावांची सविस्तर माहिती प्रशासनाने घेवून ती सभागृहात सादर केल्यावर आज (दि.११) या प्रस्तावांना बहुमताने मंजूरी देण्यात आली. तसेच मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याच्या निविदेलाही बहुमताने मंजुरी देण्यात आली.

 

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा आज सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.यावेळी व्यासपीठावर आयुक्त डॉ.उदय टेकाळे, उपायुक्त अजित मुठे, उत्कर्ष गुटे, मिनीनाथ दंडवते, मुख्यलेखाधिकारी संतोष वाहुळे, नगरससचिव सुनील गोराणे हे उपस्थित होते. या सभेत विषयपत्रिकेवर सहा विषय होते. यात सुरवातीलाच मागील इतिवृत्त मंजूर करण्याच्या प्रस्तावाला शिवसेना व एमआयएमने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तसेच इतर विषयांनाही त्यांनी विरोध दर्शवला.

अडीच वर्षापूर्वी नाशिकच्या इशान वेस्ट प्रोडेक्‍शन मॅनेजमेंट कंपनीनी महापालिकेचा बंद पडलेला घनकचरा प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. महासभेने यावर ठरावही केला होता. त्यात तत्कालीन आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकरांनी शासनाकडे हा प्रस्ताव पाठविला होता. परंतू महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाठपुरावा न केल्याने आज २० कोटी रुपये जे महापालिकेचे खर्च होत आहे, ते झाले नसते असा आरोप लढ्ढांनी केला. तसेच मंजूर प्रस्ताव प्रलंबीत ठेवून इशान कंपनीच्या प्रस्तावावर प्रशासनाने विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

तो प्रस्ताव तसा चांगला होता पण कंपनीने फायनान्शीयल मॉडल नसलेला हा प्रस्ताव दिला होता. कंपनी कुठून एवढा खर्चाचा ताळमेळ साधेल, त्याचा उल्लेख प्रस्तावात नव्हता. एखादी गोष्ट मोफत असेल तर त्याच्या सर्व बाबी तपासणे गरजेचे असते. हा प्रस्ताव शासनाकडे गेला असता असे सर्व प्रस्ताव नामंजूर झाले होते. त्यात या प्रस्तावाचाही समावेश होता. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापनाचे सर्व शहरांचे डीपीआर मंजूर शासनाने केले. त्यात अडीच वर्षांनंतर या कंपनीला आता जाग आली आहे, तसेच निविदा प्रक्रियेतही त्यांनी सहभाग घेतलेला नाही, हे सगळे मुळात अव्यवहारी वर्तन वाटते. खरेच जर कंपनीला कामाची तळमळ असेल तर इतर कामांसाठी त्यांना तयार करू असे उत्तर आयुक्तांनी यावेळी दिले.

कचरा बायोमायनिंग प्रस्ताव मंजूर:-  भाजप सदस्या उज्वला बेंडाळे यांनी मागील सभेत मक्तेदाराच्या कामाची माहिती घेतली का ? याची विचारणा केली होती. यावेळी उपायुक्त दंडवते यांनी कराड व पंढरपुर येथील अधिकाऱ्यांकडून माहिती घेवून दोघांकडचे काम यशस्वी झाल्याची कागदपत्रे सभागृहात सादर केली. त्यावर हा प्रस्ताव बहुताने मंजूर करून अटी शर्तीनुसार हे काम प्रशासनाने मक्तेदाराकडून पूर्ण करून घ्यावे. काम पूर्ण न झाल्यास जबाबदार प्रशासन राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version