Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नशिराबाद येथे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पालखीची मिरवणूक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या वतीने गुढीपाडवानिमित्त शनिवारी २ एप्रिल रोजी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पालखीचे पूजन करून मिरवणूक काढण्यात आली.

 

कार्यक्रमाच्या सुरूवातीला गावातील विठ्ठल मंदिराजवळ प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, अध्यक्ष जनार्दन माळी, उपाध्यक्ष डॉ. विकास चौधरी, संचालक राजू पाटील, विनायक वाणी, मुख्याध्यापक सी.बी. अहिरे, प्रविण महाजन यांच्यासह सर्व शिक्षक व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

इयत्ता चौथीच्या विद्यार्थीनींनी नृत्य सादर केल्यानंतर पालखी सोहळ्याला सुरूवात करण्यात आली. पालखी सोहळ्यात प्रभू श्रीरामचंद्र, सितामाता, लक्ष्मण, हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत सावता महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व  अहिल्याबाई होळकर यांचा सजीव आरास देखावा करण्यात आलेला होता.

 

या कार्यक्रमात विठ्ठल मंदिर ते राम मंदिर पर्यंत वनवासी अवतरातील राम, सीता व लक्ष्मण यांची वेशभूषा दाखविण्यात आली व राम मंदिरात श्री रामाचे अयोध्येत आगमन दाखविण्यात येऊन तिथे प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला व तेथून पुढे विठ्ठल मंदिरापर्यंत श्री रामाचे राज अवतारातील रूप दाखविण्यात आले.

 

या मिवणुकीत माध्यमिक विभागाचे ढोल, ताशे,  लेझीम, काठी फिरवणे, समूह नृत्य  यांचे आयोजन करण्यात आलेले होते तसेच सर्व विद्यार्थांनी मराठी वेशभूषा परिधान केलेली होती. या कार्यक्रमात पालकांनी सुद्धा   घरासमोर रांगोळी काढून दिंडी चे पूजन करून स्वागत केले. या कार्यक्रमाचे नियोजन अनिल चौधरी, संगिता जोशी व शिल्पा धर्माधिकारी यांनी केले तर त्यांना सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

 

Exit mobile version