Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोकसभेसारख्याच विधानसभा निवडणुका एकत्रित लढणार – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्रात महाविकास आघाडीने लोकसभा निवडणूकीमध्ये मिळवलेले यश त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित करणारा ठरल्यानंतर आता हाच फॉर्म्युला लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणूकीमध्येही दिसणार आहे. मविआ च्या आज मुंबई मध्ये झालेल्या बैठकीनंतर मीडीया शी बोलताना कॉंग्रेस नेता पृथ्वीराज चव्हाणयांनी ही मोठी घोषणा केली आहे. संविधान वाचवण्याची ही लढाई असल्याचं सांगत महाविकास आघाडी विधानसभेला देखील एकत्रित समोर जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या वेळी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांनी मोदींवर निशाणा साधलेलं पहायला मिळालं आहे.

महाराष्ट्रात लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणूक अवघ्या 3-4 महिन्यांवर आली आहे. त्यामुळे मविआ देखील पुन्हा कामाला लागली आहे. यावेळी शिवसेना यूबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले की, भाजपविरोधात कोणीही लढू शकत नाही, असं वाटणार्‍यांना महाराष्ट्रातील जनतेने आरसा दाखवला आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आम्ही ऋणी आहोत. हा लढा संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी होता. आता मोदी सरकार एनडीए सरकारमध्ये बदलले आहे. हे सरकार किती दिवस काम करेल याबाबत साशंकता आहे. विधानसभा निवडणूक आम्ही एकत्र लढणार आहोत. असे त्यांनीही म्हटलं आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशिवाय काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज सर्वजण एकत्र आले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने मविआ च्या उमेदवारांना विजयी केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज प्रथमच बैठक झाली. ही पत्रकार परिषद जनतेचे आभार मानण्यासाठी आहे. महाराष्ट्रात आम्हाला चांगली मते मिळाली आहेत. जनतेने ज्या पद्धतीने मतदान केले, तेच प्रेम विधानसभा निवडणुकीतही मिळेल आणि आता महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होईल, अशी आशा आहे. असे ते म्हणाले आहेत.

Exit mobile version