प्राचार्य डॉ. किसन पाटील वाङ्मय पुरस्काराचे पाचोऱ्यात वितरण

पाचोरा लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा पाचोरा आणि प्राचार्य डॉ. किसन पाटील ज्ञानपरंपरा, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. किसन पाटील वाङ्मय पुरस्काराचे वितरण पाचोरा येथील मानसिंगका महाविद्यालयात संपन्न झाले.

तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री.शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात अमरावती येथील कवी पवन नालट यांच्या ‘मी संदर्भ पोखरतोय’ या कवितासंग्रहाला अकरा हजार रुपये, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात आले.

दोंडाईचा येथील कवयित्री लतिका चौधरी यांच्या ‘माती’ आणि जळगाव येथील कवयित्री उषा हिंगोणेकर यांच्या ‘धगधगते तळघर’ या कवितासंग्रहांना विभागून दोन हजार पाचशे रुपये, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे खानदेशस्तरीय पारितोषिक औरंगाबाद येथील ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. सतीश बडवे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी ते म्हणाले की, “डॉ. किसन पाटील आणि माझी मैत्री एका साहित्यिकाची आहे आणि म्हणूनच ती आजही ज्ञानाच्या परंपरेचे महत्त्व विशद करते. डॉ. किसन पाटील म्हणजे चांगल्या गुणांचा समुच्चय होय. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर लोकसाहित्य या विषयावर अनेक व्याख्याने दिलीत. ते पुढे म्हणाले की, आज कवी व कवयित्रींचा सत्कार आयोजित केला आहे. कवी तो असतो ज्याला स्वतःच्या काळाचे भान असते अशा कवींनी समष्टीचा विचार करून साहित्याची परंपरा तळागाळापर्यंत पोहोचविली पाहिजे.” असे मत व्यक्त केले.

या पुरस्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी होते. त्यांनी आपले विचार प्रकट करताना सांगितले की, डॉ. किसन पाटील यांच्या लेखनात अनेक बारकावे जाणवतात, त्यांचे साहित्य आणि प्रेरणा त्यांच्या संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी आहे. म्हणूनच तर प्राचार्य डॉ. किसन पाटील वाङ्मय पुरस्काराचे वितरण हे त्यांच्या स्मृतीस उजाळा देणारे आहे. असे मत व्यक्त केले.

यावेळी कवी पवन नालट म्हणाले की, “ज्या टीकेतून आम्हाला प्रेरणा मिळते त्या टीकेला आमच्यासारखे कवी खूप महत्त्व देतात. मी माझ्या जीवनात अनुभवातूनच कवितेचे लिखाण केले आणि त्या अनुभवातून प्रकट होणाऱ्या कवितांचेच वाचन केले अशी भावना व्यक्त केली. तर कवयित्री लतिका चौधरी म्हणाल्या की, “हा पुरस्कार मिळाल्याचा विशेष अभिमान मला होतो आहे. असेच पुरस्कार आम्हास साहित्य क्षेत्रात काम करताना खूप मदत करत असतात. डॉ. किसन पाटील सरांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार मला लिखाणासाठी नवी ऊर्जा देणारा ठरणार असल्याचे” त्यांनी सांगितले.

डॉ. किसन पाटील सरांच्या जीवनाला उजाळा देताना डॉ. अशोक कोळी म्हणाले की, “डॉ. किसन पाटील हे आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्रभर नावारूपास आले. आपले आयुष्य त्यांनी शैक्षणिक व सामाजिक कार्यास वाहून घेतले म्हणूनच तर खानदेशात साहित्यिकांची नवीन पिढी घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.” अशा भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत कार्याध्यक्ष प्रा. डॉ. वासुदेव वले म्हणाले की, “गुरुवर्य डॉ. किसन पाटील यांचे शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रात फार मोठे योगदान आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने खानदेशात महाराष्ट्र साहित्य परिषद वाढवली. म्हणून डॉ. किसन पाटील व महाराष्ट्र साहित्य परिषद हे एक अनुबंध खानदेशात तयार झाले आहे.” असे विचार प्रकट केले.

याप्रसंगी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक डॉ. जयंतराव पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा पाचोराचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील, अशोक महाजन, श्रीमती उज्वला महाजन, डॉ. योगेश महाले, डॉ. ए. एन. भंगाळे, डॉ. डी. एम. मराठे, प्रा. एस. ए. कोळी, डॉ. डी. एच. तांदळे, डॉ. अतुल देशमुख, महाराष्ट्र साहित्य परिषद पाचोरा शाखेचे सर्व सभासद व प्राध्यापक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. संदीप माळी यांनी तर आभार प्रदर्शन अजय अहिरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. एस. बी. तडवी, प्रा. पी. एम. डोंगरे, प्रा. के. एस. इंगळे, प्रा. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. संगीता बडगे, प्रा. माणिक पाटील, प्रा. अतुल पाटील, डॉ. बालाजी पाटील, प्रा. अधिकराव पाटील, डॉ. जितेंद्र सोनवणे, प्रा. गणेश देशमुख, प्रा. नितीन पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, विजय सोनजे, मच्छिंद्र जाधव, प्रविण खेडकर, जयेश कुमावत, जावेद देशमुख, घन:श्याम कोरोशिया, उमेश माळी, बी. जी. पवार यांनी परिश्रम घेतले.

Protected Content