Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात महिलेची रुग्णवाहिकेतच झाली मुदतपूर्व प्रसूति

जळगाव (प्रतिनिधी) कुंभारखेडा येथून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत असलेल्या गरोदर महिलेला घेवून येणार्‍या रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसूती होवून मुलगी जन्माला आल्याची घटना आज (दि.७) सकाळी घडली. सुदैवाने यावेळी रुग्णवाहिका रुग्णालयात पोहचल्याने बाळासह आईला वेळीच उपचारासाठी दाखल करण्यात आले. बाळ व आई दोघे सुखरुप आहेत.

अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील कुंभारखेडा येथील उषाबाई तेजमल राठोड (वय 19) या विवाहितेच्या गर्भधारणेला सात महिन्यांचा काळ पूर्ण झाल्यावर गुरुवारी सकाळी प्रसूती कळा सुरु झाल्या. त्यानुसार नातेवाईकांनी तिला वाकोद येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी प्रसाधनासाठी अडचण असल्याने जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार चालक विजय पांढरे हे रुग्णवाहिकेतून उषाबाई हिस जिल्हा रुग्णालयात घेवून येत होते. सोबत उषाबाई हिची सासू भुलीबाई ज्ञानसिंग राठोड तसेच मावससासू अनुसयाबाई राठोड होत्या.लवकरात लवकर जिल्हा रुग्णालयात पोहचण्यासाठी चालक पांढरे यांची कसरत सुरु होती. जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशव्दाराजवळ रुग्णवाहिका पोहचता कळा असह्य झालेल्या उषाबाई यांची प्रसूती रुग्णवाहिकेतच होवून मुलगी जन्माला आली. दोघींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघीही सुखरुप आहेत. गर्भाशयाचे तोंड मोठे असल्यास अथवा काही दुखापत झाल्यास नऊ महिने पूर्ण होण्याआधीच प्रसूती होवू शकते. त्याच कारणाने उषाबाई या महिलेची सात महिन्यात नॉर्मल प्रसूती झाली व तिने मुलीला जन्म दिला आहे, अशी माहिती डॉ. मीना दामोदरे यांनी दिली आहे.

Exit mobile version