Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा नियोजन समितीची पूर्व तयारी आढावा बैठक

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा नियोजन समितीची बैठक ३० रोजी होणार असून याच्या पूर्व तयारीसाठी आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

जिल्हा नियोजन समिती पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहात संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक विवेक होशिंग, यावल वन विभागाचे उप वनसंरक्षक श्री. पद्मनाभा, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जिल्हा नियोजनच्या निधीतून मागील वर्षी केलेल्या कामांचे फोटो जीपीएस प्रणालीवर अपलोड करावेत. चालू वर्षी कामांचे नियोजन करतांना त्या कामाची आवश्यकता, उपयोगिता व जनहित लक्षात घेऊनच प्रस्ताव सादर करावेत. विकास कामे सुचवितांना बहुउपयोगी कामांवर भर देण्यात यावा. कामे सुचविताना दोन यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक आहे. सुचविलेली कामे चांगल्या दर्जाची व गुणवत्तेची असावी. कामे विहित वेळेत पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांची राहणार असल्याने त्यानुसार कामांचे नियोजन करावे. ज्या विभागांना कामांसाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यांनी तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करुन वर्क ऑर्डर द्यावी तसेच निधी मागणीचे प्रस्ताव सादर करावेत. त्याचप्रमाणे यंत्रणांनी आयपास प्रणालीचा वापर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषदेला मागील आर्थिक वर्षात देण्यात आलेला निधी यावर्षी पूर्ण खर्च होणे आवश्यक आहे. मागील वर्षीच्या स्पीलमधून करावयाची कामे तातडीने पूर्ण होतील याकडे संबंधित यंत्रणेच्या प्रमुखांनी लक्ष देण्याचेही त्यांनी सूचित केले.

यावेळी मागील बैठकीच्या इतिवृत्तातील अनुपालनावर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ मध्ये मार्चअखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. तर सन २०२१-२२ मधील सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र योजनांचा ऑगस्टपर्यंच्या खर्चाचाही आढावा घेण्यात आला.

जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ या वर्षासाठी मंजूर नियतव्यय ५३६ कोटी ५ लाख ५१ हजार रुपयांचा असून आतापर्यंत २१७ कोटी ५० लाख रुपये बीडीएसवर प्राप्त झाले आहे. जिल्हाधिकारी यांचेकडून आतापर्यंत ४१ कोटी ४१ लाख ११ हजार रुपयांचा निधी विविध यंत्रणांना वितरीत केला असून आतापर्यंत ३६ कोटी ९२ लाख ४५ हजार रुपये खर्च झाल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी बैठकीत दिली.

या बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी विनोद गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, डिगंबर लोखंडे, शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे, जिल्हा नियोजन कार्यालयाचे डी. एस. पाटील, श्री. सुर्यवंशी यांचेसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

Exit mobile version