Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

थॅलेसेमिया आजार टाळण्यासाठी विवाहपूर्व चाचणी आवश्यक – अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद

जळगाव प्रतिनिधी । थॅलेसेमिया हा गंभीर आजार असून विवाहापूर्वी तपासणी करून घेतली तर समाजातून थॅलेसेमिया हा आजार हद्दपार होईल असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षाच्या वतीने थॅलेसेमिया आजाराविषयी जनजागृती करण्याबाबत कार्यक्रम इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीत आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी डॉ. रामानंद बोलत होते. मंचावर प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब गलांडे, रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, गनी मेमन आदी उपस्थित होते.  यावेळी थॅलेसेमिया विषयी जनजागृती करणाऱ्या पोस्टरचे  मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. प्रसंगी काही रुग्णांची थॅलेसेमिया विषयीची तपासणी करण्यात आली. याबाबत जनजागृती करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्न करण्याची गरज विशद करण्यात आली. 

प्रसंगी बोलताना डॉ.  रामानंद यांनी सांगितले की, थॅलेसेमिया हा रक्तातील मेजर अनुवंशिक गंभीर आजार असून त्यासाठी अद्याप कुठलीही लस व औषधी उपलब्ध नाही. याबाबत जनजागृती करणे हा एकमेव उपाय आहे. या आजाराच्या रुग्णाच्या शरीरात रक्ताची सतत कमी असते.  महिन्यातून दोन वेळा रक्त द्यावे लागते. आपल्या लोकसंख्येत साधारण चार टक्के लोक थॅलेसेमिया मायनर आजाराने ग्रस्त आहेत.  आई-वडील दोघेही थॅलेसेमिया मायनर असतील तर त्यांच्या बाळाला हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. विवाहापूर्वी हिमोग्लोबिन इलेकटो रेसिस ही तपासणी करून घेतली पाहिजे. सरकारी रुग्णालयांमध्ये याबाबतची तपासणी मोफत आहे, असेही डॉ.रामानंद यांनी सांगितले.  यावेळी भाऊसाहेब अकलाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.  याप्रसंगी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

Exit mobile version