प्रतापदादांचे पहाडी सूर विसावले !

प्रख्यात भीमशाहीर तथा मुक्ताईनगरचे सुपुत्र प्रतापसिंह बोदडे काळाच्या पडद्याआड गेले असून या माध्यमातून परिवर्तनवादी चळवळीचा बुलंद आवाज शांत झाला आहे. त्यांच्या कार्याची महत्ता विशद करणारा हा विश्‍वनाथ बोदडे यांचा लेख !

प्रख्यात गायक कवी , ज्यांच्या नसानसात व विचारात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले ,शाहू महाराज, डॉ भीमराव जी आंबेडकर होते व ज्यांनी या थोर पुरुषांचे विचार खर्‍या अर्थाने तळागाळापर्यंत अत्यंत मनापासून ज्यांनी पोहोचवले ते आज संपूर्ण जगाचा निरोप घेऊन गेले आहेत. मुक्ताईनगर खर्‍या अर्थाने संतांची भूमी असून या भूमीमध्ये असे रत्न निर्माण झाले आहेत की त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशात आपले नाव आपल्या कलेच्या माध्यमातून विचारांच्या माध्यमातून कर्तुत्वाच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवले आहेत यामध्ये बोदडे ह्या नावाला संपूर्ण देशात जर कोणामुळे ओळखले जात असेल तर ते नाव म्हणजे प्रताप सिंग जी बालचंद जी बोदडे !

योगायोग सुद्धा बघा काल संत मुक्ताबाई यांची पालखी रवाना झाली आणि दुसरीकडे प्रतापसिंग बोदडे यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचे आपल्या शहरावर अपार असे प्रेम होते.
आम्ही लहान असताना जेव्हा काहीच समजत नव्हते तेव्हा मात्र एक आकर्षण होते ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त होणार्‍या कव्वाली मुकाबल्याचे ! प्रतापदादा स्वतःच्या अंतकरणापासून लिहिलेले गीत सादर करायचे त्यावेळेस अक्षरशः अंगावर काटे उभे राहायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शांतिदूत गौतम बुद्ध यांच्या विषयी प्रतापसिंग बोदडे आपल्या लेखणीच्या माध्यमातून खूप काही सांगून गेलेले आहेत. मला आजही आठवते आता लिहित असताना सुद्धा अंगावर काटे येतात, डोळ्यात अश्रू येतात , तेंव्हा काका पाणी वाढ ग बाई पाणी वाढ ग हे गीत सादर करत होते, त्यावेळेस समोर बसलेले प्रेक्षक अक्षरश: रडत असायचे. काकांनी ज्याप्रकारे वामनदादा यांचा वारसा पुढे चालवला यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटतो.

प्रतापसिंगजी बोदडे एक वाक्य बोलून गेले होते, मुक्ताईनगर मध्ये मला कधीही जातिवाद वाटला नाही व माझ्या सोबत कोणी केला नाही. जेव्हा आम्ही भेटायचो मुंबई ,नाशिक ,औरंगाबाद किंवा मुक्ताईनगरला तेव्हा काका आपुलकीने चौकशी करायचे माला म्हणायचे तू शेअर बाजार व आथिर्क क्षेत्र अश्या वेगळ्या क्षेत्रामध्ये वेगळं नाव करत आहे याबद्दल अभिमानाने बोलत राहायचे ,प्रतापसिंगजी बोदडे यांनी लिहिलेले भीमराज कि बेटी हू , दोनच राजे इथे जन्मले, कंठा कंठात गंधार स्वर, आहे भीमराव आंबेडकर, माझ्या भीमाची नजर असे अनेक गीते आहेत…..
प्रतापसिंगजी बोदडे यांचे महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील गायकांनी गायलेले आहेत यामध्ये शिंदे घराण्यातील तिसर्‍या पिढीने सुद्धा त्यांच्या सोबत गीत सादर केलेले आहे, प्रल्हाद शिंदे असोत विठ्ठल उमप असोत आशा मोठया गायकांनी यांचे गीत गायन करून त्यांच्या प्रतिभेचा सन्मान केला आहे. नोकरी करून चळवळ सांभाळणे किती कठीण असतं , याच्या वेदना त्याच्या परिवाराने सुद्धा खूप भोगल्या आहेत. परंतु त्यापलीकडे तळागळातील समाजाला एक प्रबोधन कशा माध्यमातून होईल असे काम प्रतापसिंगजी बोदडे करता होते ,त्यामुळे त्यांच्या परिवारांनी सुद्धा ह्या वेदना एका बाजूला ठेवून त्यांना नेहमी सहकार्य व सकारात्मक पाठिंबा देत होते.

या मोठ्या माणसामध्ये एवढे विवीध रूपी गुणसंपन्नता होती की काय सांगू ! ते बहुभाषाविद होते. मराठी, हिंदी, उर्दू इंग्रजी ते अस्खलीतपणे बोलायचे. हिंदी मराठी , उर्दू शायरी चा प्रकार त्यांनी साधारणता त्यांच्या वयाच्या चाळीशीनंतर शिकला आणि कव्वाली असा प्रकार सुद्धा त्यांनी महाराष्ट्रभर सादर केला. गेल्या काही दिवसापासून त्यांची तब्येत खालावली होती. अधून-मधून फोन व्हायचा तेव्हा खूप आपुलकीने बोलायचे. मला त्यांचे दोन वाक्य खूप हृदयाला हात घालुन गेलेले वाटतात ,एके वेळी मी मुंबईला असताना माझ्यावर काही वाईट प्रसंग झाला होता तेव्हा प्रतापसिंग बोदडे व डॉक्टर प्रवीणजी बोदडे डोंबिवली येथील माझ्या घरी आले होते. तेव्हा काकांनी मला एक आशीर्वाद रुपी संदेश दिला होता की, सर सलामत तो पगडी पचास ! ज्याचा मला आयुष्यात खूप फायदा झाला. मागच्या शनिवारी मी जेव्हा गावी आलो तेव्हा काका गार्डन जवळ खाट टाकून बसलेले होते मी गेलो दर्शन घेतले आणि काकाच्या तब्येतीची चौकशी केली काकांनीही आपुलकीने विचारपूस केली. खूप मला अभिमान आहे तुझा आणि एक वेगळ्या आवाजात असं सांगितलं की आता ह्या गार्डन मध्ये मी फिरतो आणि थोडा आराम करतो थकवा कमी झालेला आहे तब्येत मध्ये सुधार होत आहे, त्यावेळी ते म्हटले होते , आपण जरी काही करणे सोडले तरी ते करणे आपल्याला सोडत नाही, हे वाक्य बोलून काकांनी खूप काही असा मोठा संदेश युवकांना दिला आहे आणि अचानकपणे आज अशी बातमी आली या बातमीवर खरं विश्वासच बसला नाही जेव्हा मी त्यांची मुलगीला फोन केला तर जावई बापू म्हणाले हो हे खर आहे तेव्हा मात्र धक्काच बसला.

प्रतापसिंग जी बोदडे यांचे मुक्ताईनगर वर एक वेगळे प्रेम होते. ते नेहमी आपल्या गायनाच्या माध्यमातून किंवा जे तरुण मुलं असतील जे अनुभवी लोक असतील अभ्यासू पिढी असेल आणि साहित्यक असतील किंवा आमच्यासारखे बाहेर राहणारे असतील कुठेही भेटलं तरी आपुलकीने चौकशी करायचे योग्य मार्गदर्शन करायचे. काय लागत असे विचारायचे ,जेव्हा ते माझ्या बातम्यांचे कटींग वाचायचे त्यावेळेस मात्र मी एक वेगळ्या क्षेत्रात काम करत आहे आणि ते करत असताना आर्थिक क्षेत्र तू निवडले व ते कायम काम करत आहे त्याचा अभिमान वाटतो असे म्हणायचे. त्यांचे पुतणे तथा जळगाव जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती जयपालजी बोदडे यांच्याबद्दल खूप कौतुकाचे उदगार काढायचे. कारण त्यांच्या दोघा भावांमध्ये खूप प्रेम होते परंतु लहान भाऊ अचानक सोडून गेल्याने व त्यानंतर त्याच्या परिवाराची त्यावेळेस ची परिस्थिती पाहता जयपाल यांनी केलेला संघर्ष व राजकारणात मिळवलेले यश याबद्दल त्यांना खूप अभिमान वाटायचा.

प्रतापसिंग जी बोदडे यांचा वारसा आमचे बंधू कुणालजी बोदडे आमच्या ताई ह्या चालवत आहेत. खंत एवढेच वाटते या माणसाचा जसा पाहिजे तसा सन्मान महाराष्ट्र शासन अथवा केंद्र शासनाने केला नाही. जर हा खरंच करुन त्यांना मरणोत्तर पुरस्कार द्यावा अशी विनंती मी स्थानिक लोकप्रतिनिधींना करणार आहे.

प्रतापसिंग बोदडे जरी आपल्या सोडून निघून गेले असले तरी त्यांच्या कवितांच्या माध्यमातून गीतांच्या माध्यमातून विचारांच्या माध्यमातून ते अमर आहेत. त्यांचे धगधगते आणि वंचितांच्या व्यथा-वेदनांना स्वाभीमान प्रदान करणारे सूर कधीही मिटणार नाहीत. लोप पावणार नाहीत. अशा या महान कलावंताला विनम्र अभिवादन.

विश्वनाथ बोदडे , नशिक
८८८८२८०५५५५

Protected Content