Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रतापराव पाटील यांना ‘उत्कृष्ट जिल्हा नियोजन अधिकारी’ पुरस्कार जाहिर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्याचे नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांना राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा उत्कृष्ट जिल्हा नियोजन अधिकारी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे आर्थिक नियोजन व सांख्यिकीय पद्धतीचा विकास यामध्ये विख्यात सांख्यिकीय शास्त्रज्ञ प्रा. प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन २९ जून हा दिवस दरवर्षी सांख्यिकी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन २००७ पासून केंद्र शासनाने घेतलेला आहे. त्यानुषंगाने राज्य स्तरावर या वर्षाचा सांख्यिकी दिनाचा कार्यक्रम दि. २९ जुन रोजी सकाळी १०.०० वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, रंगस्वर हॉल, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई – येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेला आहे.

या राज्यस्तरीय कार्यक्रमात सन २०२२ पासून सांख्यिकी दिनाचे दिवशी राज्यात सांख्यिकी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या अधिकारी/कर्मचारी यांचा गौरव करण्यात येतो. यंदाच्या वर्षी उत्कृष्ट जिल्हा नियोजन अधिकारी हा पुरस्कार जळगाव जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांना जाहीर करण्यात आलेला आहे.त्यानुषंगाने प्रतापराव पाटील यांचा दि. २९ जुन रोजी आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. आज सदर पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नियोजन विभागातील सहकार्‍यांनी त्यांचा हृद्य सत्कार केला.

प्रतापराव पाटील हे शासकीय सेवेतून ३१ ऑगस्ट, २०२३ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. या आधी त्यांच्या कार्यक्षमतेचा राज्य सरकारने यथोचित गौरव केल्याची भावना व्यक्त होत आहे.

Exit mobile version