विकासकामांच्या जगन्नाथाचा रथ अविरतपणे ओढणार- खा. उन्मेष पाटील

चाळीसगाव प्रतिनिधी । आपण खासदार बनलो तरी फक्त पद बदलले असल्याचे नमूद करत विकासकामांच्या जगन्नाथाचा रथ अविरतपणे ओढणार असल्याची ग्वाही खासदार उन्मेष पाटील यांनी मतदारसंघातील जनतेला समाजमाध्यमातून संबोधित करतांना दिली आहे.

खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या फेसबुक पेजवरून चाळीसगाव मतदारसंघातील जनतेशी संवाद साधला. यात ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या टीमचा सदस्य म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली असतानाच राज्यातील कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने व नामदार गिरिशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाने आचारसंहिता संपून ४८ तास होत नाहीत तोच चाळीसगाव वासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची भुयारी गटार योजनेला मंजुरी मिळाली, यात शहरांतर्गत पहिल्या ९० किलोमीटर च्या टप्प्यासाठी ६८ कोटी इतका निधी प्राप्त झाला त्याबद्दल चाळीसगाव वासीयांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. शहरातील उघड्या गटारींमुळे निर्माण होणारी दुर्गंधी, अस्वछता व यातून विशेषतः लहान मुलाना वारंवार होणारे आजार आदी आरोग्याचा मोठा प्रश्‍न निर्माण होतो. यावर उपाययोजना म्हणून इतर विकसित शहरांप्रमाणे आपल्या शहरात देखील भुयारी गटारी असाव्यात, गटारींचे सांडपाणी यावर प्रक्रिया व्हावी म्हणून नगरपालिका निवडणूक जाहीरनाम्यात आपल्याला या समस्येपासून मुक्त करण्याचा शब्द दिला होता. मंजूर झालेली भुयारी गटार योजना म्हणजे तुमच्या – आमच्या स्वप्नातील स्मार्ट – स्वच्छ – सुंदर चाळीसगाव घडविण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे असं मी मानतो.

खासदार उन्मेष पाटील पुढे म्हणाले की, अडीच वर्षांपूर्वी आपल्या आशिर्वादाने ऐतिहासिक परिवर्तन घडवत प्रथमच भारतीय जनता पक्षाच्या हातात नगरपालिकेची सत्तासूत्र आली. ७१ कोटींची शहरांतर्गत पाणीपुरवठा योजना, घंटागाड्या व घनकचरा प्रकल्प, शिवस्मारक व शिवसृष्टी, संपूर्ण शहरात एलईडी लाईट आदी अनेक शहर विकासाची कामे या काळात मार्गी लावता आली याचा मला विशेष आनंद आहे. या अडीच वर्षाच्या काळात काही विरोधी तर काही स्वपक्षातील झारीतल्या शुक्राचार्यांनी शहरांतर्गत पाणीपुरवठा योजना, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व शिवसृष्टी, भुयारी गटार योजना आदी शहर विकासाच्या, शहराच्या सौन्दर्यात भर घालणार्‍या विकासकामांना खीळ घालण्याचा प्रयत्न केला. अन्यथा आमच्या सर्व सहकार्‍यांच्या नियोजनानुसार या योजनांची कामे आज खूप मोठ्या प्रमाणावर सूर राहिली असती. मात्र जनता हा सर्व खेळ बघत होती आणि जनतेचे मतदानाच्या माध्यमातून या विकासविरोधी प्रवृत्तीना चपराक लगावली. आपण खासदार म्हणून दिल्लीत गेलो असलो तरी केवळ माझे पद बदलले असं मी मानतो, आपल्याला दिलेला प्रत्येक शब्द पाळण्यासाठी मी व माझे सहकारी आपले नम्र सेवक बनून यापुढेही विकासकामांचा हा जगन्नाथाचा रथ ओढत राहू असा विश्‍वास आपल्याला देतो.

खासदार उन्मेषदादा पाटील यांची फेसबुक पोस्ट.

Add Comment

Protected Content