Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाविकास आघाडीतील नेत्यांविषयी बदनामीकारक पोस्ट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

बारामती, वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर बदनामीकारक मजकूर टाकणाऱ्या दोघांवर आरोप आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांविषयी बदनामीकारक पोस्ट करणाऱ्या दोघा जणांवर बारामतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केशव कुंथलगिरीकर आणि भानू बोराडे या दोन फेसबुक अकाऊण्ट धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केशव कुंथलगिरीकर यांनी आदित्य ठाकरे यांचा फोटो मॉर्फ करुन त्यांची बदनामी करणारा मजकूर लिहिला होता. तर भानू बोराडे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो मॉर्फ करुन मानहानीकारक पोस्ट लिहिल्याचा आरोप आहे. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात नितीन यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.

याआधी, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्या फोटोमध्ये चित्रा वाघ आणि शिवसेना नेते संजय राठोड एकमेकांच्या जवळ उभे असल्याचं दिसत होतं. प्रत्यक्षात चित्रा वाघ आणि त्यांचे पती किशोर वाघ यांचा जुना फोटो मॉर्फ करण्यात आला होता.

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यात काही जणांनी हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावरुन एक व्हिडीओ शूट केला. “माजी मुख्यमंत्र्यांचं सोशल डिस्टन्सिंग बघा” अशा आशयाच्या कमेंट्स व्हिडीओ शूट करणारी आणि त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्ती करत होत्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

Exit mobile version