Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगरातील गटारींची कामे निकृष्ट : बहुजन मुक्ती पार्टीचा आरोप

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहरात नगरपंचायतीच्या हद्दीत डॉ.गिरीश पाटील यांच्या घरापासून ते बोदवड रोड पर्यंत लाखो रुपयांचे गटारीचे काम हे अंदाजपत्रकाला तिलांजली देऊन सुरू असून पर्यवेक्षक अधिकार्‍यांकडून आर्थिक हितसंबंधापोटी संबंधित ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला अर्थपूर्ण पाठिंबा असल्याची चर्चा शहरात असल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य संघटक प्रमोद सौंदळे यांनी पत्रकार परिषद द्वारे केला आहे.

या संदर्भात पत्रकार परिषदेत प्रमोद सौंदळे म्हणाले की, अंदाजपत्रकानुसार सदर गटारीचे खोदकाम केल्यानंतर पिचिंग केल्यानंतरच त्यावर स्टील टाकून कॉंक्रिटीकरण करणे बंधनकारक होते परंतु संबंधित ठेकेदाराने अंदाजपत्रकाला केराची टोपली दाखवत डायरेक्ट काड्या मातीवरच कॉंक्रीट टाकलेले आहे. त्यामुळे भविष्यात नैसर्गिक तत्त्वानुसार काळी माती दबून निकृष्ट कॉंक्रीट मध्ये तळे जाऊन सदर कॉंक्रीट मधून पाणी जमिनीत पाझरून संपूर्ण गटारीचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु या निकृष्ट कामाबद्दल न.प. प्रशासनाने अंदाजपत्रकात सोलिंग पिचिंग दिलेले नसल्याचे त्रयस्थ व्यक्तीमार्फत सांगण्यात येत आले .त्यामुळे नगरपंचायत च्या नफा फंडातून शहराच्या विकासासाठी दिलेल्या निधीतून संबंधित पर्यवेक्षक अधिकारी व ठेकेदार यांचाच विकास होत आहे की काय असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारात आहे.

याप्रसंगी ते पुढे म्हणाले की, नगरपंचायत प्रशासनाच्या आर्थिक पाठिंब्यामुळे सदर ठेकेदार एवढ्यावरच थांबलेला नसून सदर निकृष्ट कामांमध्ये वापरण्यात येणारे स्टील ही अंदाजपत्रकानुसार नसून त्यांची करण्यात येणारी बांधणी ही सुद्धा लांब लांब अंतरावर घेतलेली आहे. तसेच सुरू असलेल्या सदर कॉंक्रीटच्या कामावर एवढ्या उष्ण तापमानात सुद्धा आजतागायत एकदा सुद्धा पाणी मारण्यात आलेले नाही. यावरून एकंदरीतच मुक्ताईनगर नगरपंचायत च्या नफा फंडातून काढण्यात येणारी गटारी जनतेच्या सोयीसाठी नसून पर्यवेक्षक अधिकारी व ठेकेदारासाठी असल्याचे एकंदरीत सिद्ध होत असल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य संघटक प्रमोद सौंदळे यांनी पत्रकार परिषदद्वारे केला आहे.

Exit mobile version