Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दहिगावहून यावलकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था, लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथून यावलकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्त्यावर खूप खड्डे झाले असून रस्त्याची अतिशय वाईट अवस्था आहे. लोकप्रतिनिधींचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, यावल तालुक्यातील दहिगाव येथून यावलकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्त्याची अतिशय वाईट अशी खड्डेमय अवस्था झाल्याने या मार्गावरून रोज ये जा करणाऱ्या ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रश्नाकडे मात्र स्थानिक आमदार आणी खासदार तथा लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले असल्याचे स्पष्ट होत आहे. या मार्गावरील रस्त्याची तात्काळ दुरूस्ती न झाल्यास परिसरातील ग्रामस्थ या विषयाला घेवून आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे दिसून येत आहे.

काही दिवसापूर्वी परिसरातील युवकांनी रस्ता तात्काळ दुरूस्त व्हावा यासाठी प्रयत्न करूनही याचा म्हणावा तसा परिणाम न झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या चार वर्षापासून कायम वर्दळीचा विरावली, दहिगाव रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही, तसेच यावल विरावली रस्त्याचे डांबरीकरण होऊन हा रस्ता खड्डेमय झाला आहे. यावल दहीगाव आठ किलोमीटरच्या रस्त्यावरून खड्ड्यांमधून दुचाकी चारचाकी वाहने चालवणे अवघड झालेले आहे.नियमित वर्दळ असलेला या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्यामुळे रस्त्याची अजूनच दुरावस्था होत आहेत. इतर गावांकडे जाणारे रस्ते मात्र त्वरित दुरुस्त होत आहेत. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीची भावना आहे.

दहीगाव, सावखेडा सिम, विरावली, कोरपावली, महेलखेडी, मोहराळा, हरीपुरा येथील ग्रामस्थ बांधकाम विभागावर तसेच स्थानिक आमदार व खासदारांवर तीव्र नाराजी व्यक्त करित आहे. रस्ता त्वरित तयार करावा अशी मागणी जोर धरत असून शेतकरी तथा ग्रामस्थ रस्ता न झाल्यास आंदोलन करतील असा इशाराही जानके ग्रामस्थांकडून देण्यात येत आहे.

Exit mobile version