Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लॉकडाऊनमुळे घरांमधील प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ

नवी दिल्ली । एकीकडे लॉकडाऊनमुळे रस्त्यांवरील प्रदूषणाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली असली तरी याच कालावधीत जगभरातील घरांमधील प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असतांना जेव्हा वाहने रस्त्यावर धावत नव्हती, कारखाने बंद होते तेव्हा निसर्गातील हवेची गुणवत्ता वाढल्याचे दिसून आले होते. हवा इतकी स्पष्ट झाली होती की दुरवरचे दुर्गम पर्वत स्वच्छ दिसत असल्याची अनुभूती आपण सर्वांनी घेतली होती. तथापि, याच कालावधीत घरांमधील प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याचे एका संशोधनातून दिसून आले आहे.

बर्याच लोकांना असे वाटते की घरी राहून वायू प्रदूषण टाळता येऊ शकते, परंतु प्रत्यक्षात तसे नाही. जर तुम्हाला असे वाटते की घरात बाहेरील वातावरणाचे प्रदूषण कमी आहे तर हा तुमचा गैरसमज आहे. अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण संस्थेच्या अध्ययनानुसार घरातील वायू प्रदूषणाचा परिणाम बाहेरील तुलनेत दोन ते पाच टक्क्यांनी वाढले आहे. तर नॉर्वेतील दुसर्‍या एका संस्थेने अमेरिका आणि युरोपमधील एक हजाराहून अधिक वापरकर्त्यांच्या डेटाचे विश्‍लेषण केले आहे. या विश्‍लेषणामध्ये कंपनीला असे आढळले की लॉकडाऊन दरम्यान घरांमध्येही कार्बन डाय ऑक्साईड आणि घातक कणांच्या पातळीत १५-३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

याव्यतिरिक्त, एअर प्युरिफायर्स उत्पादक डायसनने ११ मोठ्या शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात असे आढळले आहे की लोकांच्या घरात नायट्रोजन ऑक्साईड आणि अस्थिर सेंद्रीय संयुगे यांचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. स्वयंपाकघरात दिलेली फोडणी तसेच शिंकल्यामुळे त्यांची पातळी वाढते. याबाबत प्राध्यापिका निकोला कारस्ला यांचे म्हणणे आहे की, बहुतेक लोक त्यांचा ९० टक्के वेळ घरात घालवतात आणि दहा टक्के बाहेर तो राहतात. लॉकडाऊनमुळे लोकांना घरात जास्त वेळ रहावे लागल्याने आतील भागातल्या प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, घरगुती वायू प्रदूषणामुळे दरवर्षी ३८ लाख लोकांचा मृत्यू होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की घरात वायु इतकी धोकादायक आणि विषारी आहे की लोकांना दमा, न्यूमोनिया, फुफ्फुसांचा संसर्ग, कर्करोग आणि हृदयरोग जास्त प्रमाणात होत आहेत. जगात अद्यापही सुमारे ३० कोटी लोक हे दैनंदिन स्वयंपाकासाठी गवत, लाकूड आणि कोळसा वापरतात. ज्यामुळे कार्बन मोनोऑक्साईड, कार्बन डाय ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड आदींच्या प्रमाणात वाढ होते. लॉकडाऊनमध्ये याचमुळे घरांमधील प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याचा निष्कर्ष या अध्ययनातून काढण्यात आला आहे.

Exit mobile version