Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचे चित्ररथ रोखण्यामागे राजकीय षडयंत्र ; सेना, राष्ट्रवादीचा आरोप

supriya sule and sanjay ravut

 

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचे चित्ररथ यावेळी प्रजासत्ताक दिनी दिसू नयेत यामागे राजकिय षडयंत्र आहे काय? आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का?, तसेच सरकार आकसाने वागत असून विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

 

महाराष्ट्राचा चित्ररथाचा प्रस्ताव नाकारण्यात आल्यामुळे यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात राज्याचा चित्ररथ दिसणार नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत महाराष्ट्राचा चित्ररथ डावलला तरी भाजपा गप्प का? अशी विचारणा केली आहे. हे काँग्रेस राजवटीत घडले असते तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती अशी टीकाही यावेळी त्यांनी केली आहे. महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात नेहमीच देशाचे आकर्षण ठरत आला आहे. अनेकदा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राच्या चित्ररथाने पटकावलेला आहे. असे असतानाही महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचा आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला. तर सुप्रिया सुळे यांनीही प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली.हा देशाचा उत्सव असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे.परंतु सरकार आकसाने वागत असून विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय, असा आरोप केला आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आल्याने त्यावरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.

Exit mobile version