Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित असणे बंधनकारक; निवडणूक आयोगाचे निर्देश

election

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी तसेच मतदानाच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्वप्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत.

 

याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांनी कळविले आहे की,  अफवा पसरवणाऱ्या, आक्षेपार्ह स्वरूपाच्या राजकीय जाहिराती मतदानाच्या दिवशी व त्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध झाल्यास पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा जाहिराती प्रसिद्ध झाल्यास प्रतिपक्षाच्या उमेदवाराला स्पष्टीकरणाची संधीच मिळत नाही, असे भारत निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने वरील निर्देश दिले आहेत.

 

आयोगाला असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून मतदानाच्या दिवशी तसेच मतदानाच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिरातीबाबत परवानगीबाबतचे आदेश आयोगाने काढले आहेत. त्यानुसार कोणताही राजकीय पक्ष, उमेदवार, संघटना किंवा व्यक्तीला मतदानाच्या तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती नियमानुसार जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) कडून प्रमाणित करून घेतल्याशिवाय प्रसिद्ध करता येणार नाही, असे आयोगाने म्हटले असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. ढाकणे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version