Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलिसांनी माणुसकी सोडली ; हद्दीच्या वादातून मृतदेह साडेचार तास पडून

dead body jalgaon

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बजरंग रेल्वे बोगद्याजवळ एका अनोळखी 50 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास उघडीस आला होता. याबाबत दुपारी 3.15 वाजेपर्यंत रेल्वे विभागाने पोलीसांना कळवून देखील रेल्वे हद्दीवरून साडेचार तास मृतदेह जागेवर पडून होता. त्यामुळे पोलिसांनी माणुसकी सोडली का? असा संताप नागरिक घटनास्थळी व्यक्त करीत होते.

याबाबत माहिती अशी की, बजरंग रेल्वे पुल, पिंप्राळा रोडवरील प्रेम पेट्रोल पंपासमोरील रेल्वेच्या डाऊन रेल्वे खंबा क्रमांक 417/31 ते 418/1 दरम्यान एक 50 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. साधारण सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास मुंबईकडून भुसावळकडे जाणारी मालगाडी खाली जात असतांना या व्यक्तीने आपली मान रेल्वे ट्रॅकवर ठेवली होती. मात्र रेल्वे चालकांला समोरून कोणीतरी आत्महत्या करीत असल्याचे दिसतांच रेल्वे मालगाडीला अचानकपणे ब्रेक लावला. गाडी हळूहळू येत असतांना 50 वर्षीय व्यक्तीच्या डोक्याला जबर फटका बसला आणि जागीच ठार झाला. याबाबत रेल्वे ट्रॅकमन विकास रमेश साबळे यांनी तातडीने रेल्वे प्रबंधक यांना कळविले.

अन् हद्दीवरून वादाला सुरुवात

सकाळी 10.30 वाजता ही घटना घडल्यानंतर ट्रॅकमॅन रेल्वे प्रशासनाला आत्महत्या झाल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र दुपारी 3.15 वाजेपर्यंत रेल्वे पोलीस किंवा शहरातील पोलीस कर्मचारी यांनी हजेरी लावली नाही. रेल्वे प्रबंधक यांना घटनेबाबत मेमो कोणाला द्यायचा हा प्रश्न उपस्थित होता. सुरूवातीला तालुका पोलीस स्टेशन, रामांनद नगर पोलीस स्टेशन, जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, जीआरपी रेल्वे पोलीस यांच्यात हद्दवरून कुणीच पुढाकार घ्यायला तयार नव्हते.

दुसरीकडे साडेचार तासांपैकी दोन तास म्हणजेच सकाळी 10 ते 12 वाजेदरम्यान पाऊस सुरू होता. घटनेची माहिती मिळालेली असतांना कोणत्याही पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी यायला तयार नव्हते. अखेर रेल्वे पोलीसांनी 3.15 वाजेच्या सुमारास घटनास्थळी येवून पंचनामा करण्याचे काम सुरू केले. त्यानंतर मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला.

Exit mobile version