Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कर्तव्यावर असतांना हृदयविकाराच्या झटक्याने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सेवा बजावत असतांना अचानक हद्यविकाराचा तीव्र झटका आल्याने एका पोलिस कर्मचाऱ्याचे दु:खद निधन झाल्याची घटना १२ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याने वाकी ता. जामनेर येथील सरताले कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुळचे वाकी ता. जामनेर येथील रहिवाशी ज्ञानेश्वर रामजी सरताले (वय – ३६) हे त्यांना नेमुन दिलेल्या बनोटी पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असतांना १२ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अचानक हद्यविकाराचा तीव्र झटका आल्याने ज्ञानेश्वर सरताले यांना सहकार्यांच्या मदतीने पाचोरा येथे रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेवुन जात असतांना रस्त्याच त्यांनी प्राणज्योत मालवली. ज्ञानेश्वर सरताले यांना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. लहानपणापासूनच देशसेवा करण्याचा चंग ज्ञानेश्वर सरताले यांनी बांधला होता. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असतांना परिस्थितीवर मात करुन आपल्यातील कला कौशल्य व कसरतीच्या जोरावर ज्ञानेश्वर सरताले हे पोलिस दलात गेल्या दहा वर्षांपूर्वी भरती झाले होते. पोलिस दलात भरती झाल्यानंतर त्यांनी फर्दापुर, सोयगाव या ठिकाणी सेवा बजावुन सद्यस्थितीत ते बनोटी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. याच पोलिस स्टेशनमध्ये सेवा बजावत असतांना १२ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. ते आपल्या सहकाऱ्यांना सांगताच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ज्ञानेश्वर सरताले यांना सहकार्यांच्या मदतीने पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात नेत असतांना रस्त्यातच ज्ञानेश्वर सरताले यांची प्राणज्योत मालवली. पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी ज्ञानेश्वर सरताले यांना मृत घोषित केले. मयत ज्ञानेश्वर सरताले यांचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. पाचोरा पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी ज्ञानेश्वर सरताले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे, पोलिस काॅन्स्टेबल विनोद बेलदार, योगेश पाटील, गजानन काळे, सचिन निकम उपस्थित होते. ज्ञानेश्वर सरताले यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, एक बहिण असा परिवार असुन अतिशय मनमिळाऊ व हसमुख स्वभावाचे ज्ञानेश्वर सरताले यांच्या अकस्मात निधनाने वाकी ता. जामनेर परिसरासह त्यांचे कार्यक्षेत्र असलेले बनोटी परिसरात शोककळा पसरली आहे.

Exit mobile version