आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पोलीसांनी घेतले योगाचे धडे (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीस मुख्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या पोलीस कवायत मैदानात मंगळवारी सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पोलीस अधिक्षकांसह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होत विविध प्रकारची योगासने करून योगाभ्यास केला.

 

पोलीस मुख्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या पोलीस कवायत मैदानात मंगळवारी २१ जून रोजी सकाळी ६.३० वाजता पोलीस प्रशासनातर्फे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योगाभ्यास करताना विविध योगासनांचे धडे गिरविले. प्रारंभी प्रार्थना त्यानंतर वृक्षासन, ताडासन, त्रिकोणासन, पर्वतासन, शवासन, हलासन असे उभे आसन प्रकार तसेच भद्र्रासन, शशांकनासन, वक्रासन असे बैठे आसन प्रकारांसोबतच कपालभाती, प्राणायाम, शांतीपाठ अशी योगसाधना यावेळी करण्यात आली. दरम्यान, पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे जीवन धावपळीचे व सातत्याने तणावपूर्ण असते. कधही आणि कोणत्याही क्षणी, रात्री अपरात्री सज्ज रहावे लागते. याचा परिणाम प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनावर तसेच कुटुंबीयांवर होत आहे.  अशा परिस्थितीत  आपले शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी योगसाधना आवश्यक असल्याचे त्यांनी  सांगितले.  अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.

 

Protected Content