पोलिसांच्या सतर्कतेने बेपत्ता युवकाचा २४ तासात शोध

मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील लोहरखेडा येथील राहत्या घरातून एक युवक अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली. त्यानंतर २४ तासात पोलिसांनी त्यास शोधून काढले आहे. तपासाअंती बऱ्हाणपूर येथील एक तृतीयपंथी अजयला नागपूर येथे घेऊन गेल्याची माहिती मिळाली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, “लोहरखेडा, ता मुक्ताईनगर येथील अजय संजय माळी हा युवक दि १० जून रोजी राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबियांनी जवळ

पास आणि नातेवाईकांकडे शोध घेतला.  मात्र त्याचा पत्ता लागत नसल्याने त्याचे कुटुंबीय चिंतेत होते. त्यामुळे माळी कुटुंबीयांनी दि १२ जून रोजी मुक्ताई नगर पोलीस स्टेशनला अजय माळी यांच्या हरवल्याची तक्रार दिली. चिंतेपोटी माळी परिवाराने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पवन राजे पाटील यांना यासंदर्भात सांगितले.

त्यानंतर पाटील यांनी माळी कुटुंबियांसह यांना महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणीताई खडसे/खेवलकर यांची भेट घेत त्यांना यासंदर्भात माहिती दिली. रोहिणीताई यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेतील गांभीर्याची  माहिती देत मोबाईलचा सिडीआर लोकेशन घेण्याबाबत विनंती केली.

त्यानंतर पोलीस निरीक्षक शेळके यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून सि डी आर लोकेशन आणि इतर तांत्रिक बाबींची माहिती घेतली; त्यानुसार अजय माळी हा नागपूरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यांनी नागपूर येथील नंदनवन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागलकर यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.

दि.१३ रोजी नागपूर येथे स्थानिक पोलीस आणि माळी कुटुंबियांना अजय एका तृतीय पंथीयांच्या वसाहतीत आढळून आला. तपासाअंती बऱ्हाणपूर येथील एक तृतीयपंथी अजयला नागपूर येथे घेऊन गेल्याची माहिती मिळाली आहे. रोहिणीताई खडसे खेवलकर, पवन राजेपाटील,  पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके आणि स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने अजय माळी हा सुखरूप लोहरखेडा येथे घरी पोहचला. याबद्दल माळी कुटुंबियांनी या सर्वांचे आभार मानले.

Protected Content