Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाळू ठेका चालवित असल्याच्या तक्रारीवरून पोलीस कर्मचारी निलंबित

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील दापोरा येथे वाळू ठेका चालवित असल्याच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड यांना निलंबित करण्याचे आदेश काढले असून या वृत्ताला पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दुजोरा दिला आहे.

जळगाव तालुक्यातील दापोरा येथे एक पोलिस कर्मचारी वाळू ठेका चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अप्पासाहेब पवार यांनी दापोरा येथे कारवाई करीत आठ ब्रास वाळू जप्त केली होती. या सोबतच हा अवैध वाळूचा साठा तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्याचा असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासनाकडे केली होती. संदर्भात परिविक्षाधीन अधिकारी पवार यांनी आपला अहवाल पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना सादर केला. त्यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड यांच्या निलंबनाचे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता काढले आहे.

विश्वनाथ गायकवाड यांची चौकशी सुरू राहणार असून निलंबन काळात त्यांना पोलिस मुख्यालयी हजेरी लावावी लागणार आहे. चौकशीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे मागवून कोणते वाहन कोणाच्या नावावर आहे, याची खातरजमा केली जाणार आहे.  कामात हलगर्जीपणा, वरिष्ठांच्या सूचनांचे पालन न करणे यासोबतच गायकवाड यांच्याविषयी अनेकांच्या तक्रारी असल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. या वृत्ताला जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी दुजोर दिला आहे.

Exit mobile version