Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिस्टलसह चारचाकीतून जाणारे चौघे जेरबंद

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील भडगाव रोडवरील समर्थ व्हॅलीजवळ एका चारचाकीतून जात असलेल्या चौघांना सापळा रचून ताब्यात घेत त्यांचेकडून २५ हजार रुपये किंमतीची बंदूक आणि चारचाकी वाहन हस्तगत करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, “दि. २३ जुन रोजी मध्यरात्रीच्या सुमारास काहीजण एका चारचाकीतुन अग्निशस्त्र घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस कॉंन्स्टेबल योगेश पाटील यांनी मिळाली. त्यांनी या संदर्भात सदरची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौबे, ए.एस.आय.सुनिल पाटील, पोलिस कॉंन्स्टेबल योगेश पाटील, प्रविण परदेशी, समिर पाटील (चालक) या पथकाने मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास भडगाव रोडवरील समर्थ व्हॅलीजवळ सापळा रचला.

दरम्यान या ठिकाणाहून (एम.एच.१९ ए.एक्स. ९८१९) या क्रमांकाची टाटा कंपनीची इंडिका व्हिस्टा ही कार जात असतांना पथकाने त्यांना थांबवत चौकशी केली असता पोलिसांना एक स्टीलचे राखाडी रंगाचे त्यावर काळ्या रंगाचे हॅण्डग्रीप असलेले विना परवाना पिस्टल व मॅझीन आढळून आले. पोलीस पथकाने भैय्या निकुंभे (वय – २५) रोहीत साहेबराव झोगडे (वय – २२) रा. नाशिक, नितीन बाबुलाल नासरे (वय – २७) रा. अकोला व सचिन पाटील (वय – ३१) रा. पाचोरा या चौघांना २५ हजार रुपये किंमतीची विना परवाना पिस्टल व २ लाख ५० हजार रुपये किंमतीची इंडिका व्हिस्टा चारचाकीसह ताब्यात घेत त्यांचे विरूद्ध पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.”

या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील हे करीत आहे. पोलिस कॉंन्स्टेबल योगेश पाटील यांच्या सतर्कतेने पुढील होणारा अनर्थ टळला असून त्यांच्यासह पोलीस पथकाने दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Exit mobile version