Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कविता हेच कवीचं मनोगत असतं – नामदेव कोळी

जळगाव प्रतिनिधी | स्व .गणेश चौधरी व स्व .दिवाकर चौधरी स्मृती पुरस्कार वितरण जळगाव येथे आय.एम.ए. सभागृहात उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी पुरस्कारार्थीं कवी नामदेव कोळी यांनी “कविता हेच कवीचं मनोगत असतं. मी कष्टकऱ्यांच्या संघर्षमय जीवनावर लिहिण्याचा ध्यास घेऊन लिहीतोय” असे प्रतिपादन केले.

केशवसुत पारितोषिक प्राप्त कवी स्व. गणेश चौधरी व कादंबरीकार स्व.दिवाकर चौधरी स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार सन २०२० वितरण कार्यक्रम शनिवार दि.१८ डिसेंबर २०२१ रोजी जळगाव येथे आय.एम.ए. सभागृहात उत्साहात संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालयात अनुवादक असलेले पुरस्कारार्थीं कवी नामदेव कोळी आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले की,”कष्टकऱ्यांच्या व्यथा-वेदनांचे समाजदर्शन पूर्णपणे साहित्यात आलेच नाही म्हणून मी प्रकर्षानं कष्टकऱ्यांच्या संघर्षमय जीवनावर लिहिण्याचा ध्यास घेऊन लिहीतोय. कविता हेच कवीचं मनोगत असतं असे मार्मिक प्रतिपादन कोळींनी करीत मजबूरी, शेतमजूराच्या पोरी व सरकारी दवाखाना या कविता भावोत्कटतेने सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले .

व्यासपीठावर अध्यक्ष एम.जे.कॉलेजच्या हिंदी विभागाचे प्रमुख निवृत्त प्रा.ए.बी.पाटील असून प्रमुख अतिथी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ.आशुतोष पाटील, कवी बाळकृष्ण पाटील, चंद्रकांत चव्हाण, मातोश्री कल्पना चौधरी, हृदयरोग तज्ज्ञ डॉ . विवेक चौधरी, तहसीलदार कवी जितेंद्र कुँवर, पुरस्कारार्थी कवी नामदेव कोळी व कादंबरीकार संतोष जगताप, नेत्रतज्ज्ञ डॉ. सौ .अंजली चौधरी, सभापती यावल पंचायत समिती सौ .पल्लवी चौधरी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व माल्यार्पण झाले. प्रास्ताविकात डॉ. विवेक चौधरी यांनी, “हे पुरस्कार ‘श्री गजानन हार्ट ॲन्ड हॉस्पिटल्स’तर्फे मागील वर्षापासून पुरस्कृत केले जात आहेत .पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत प्रकाशित झालेले कवितासंग्रह व कादंबऱ्या मागवण्यात आल्या होत्या त्यास महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. प्रमुख अतिथींचे स्वागत डॉ . विवेक चौधरी व कुटुंबीयांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय अ .भा . सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष पुरुजीत चौधरी यांनी करून दिला.

पुरस्कारार्थी साहित्यिक व पुरस्काराचे स्वरूप

सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार ‘वाघूर’ दिवाळी अंकाचे संपादक तथा सुप्रसिद्ध कवी नामदेव कोळी कडगावकर यांना ” काळोखाच्या कविता ” लिखित काव्यसंग्रहास प्रा.डॉ.आशुतोष पाटील यांच्या हस्ते २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .

सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठी प्राथमिक शिक्षक संतोष जगताप ( लोणविरे, ता . सांगोला जि. सोलापूर ) यांच्या ” विजेने चोरलेले दिवस ” या कादंबरीस चंद्रकांत चव्हाण यांच्या हस्ते पंचवीस हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .

काव्यसंग्रहाचे प्रकाशन –

कार्यक्रमाच्या औचित्याने बाळकृष्ण सोनवणे लिखित ‘समजूतदार जाणिवांचे कवडसे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्राध्यापक डॉ.आशुतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या काव्यसंग्रहाविषयी चंद्रकांत चव्हाण यांनी “ही आयुष्याची सुत्रे व जगण्याचे समिकरण सोडवणारी दर्जेदार कविता असल्याचे म्हटले तर प्रा.डॉ.आशुतोष पाटील यांनी, “जगण्याचा भोवताल टिपता टिपता ‘स्व’चा अविरत शोध घेणारी व विश्व चैतन्याशी संवाद साधणारी, भावना, संवेदना व वास्तवतेची दाहकता याचे प्रत्यय देत सश्रद्धतेने अंतर्मनाची शोध घेणारी आणि कृषीकेंद्रीत ग्रामजीवनाच्या वाताहत होणार्‍या मूल्य संवादावर भाष्य करणारी कविता असल्याचे सांगितले.

पुरस्कार वितरणप्रसंगी मान्यवरांचे मनोगत –

पुरस्कार वितरणप्रसंगी मनोगत व्यक्त करताना चंद्रकांत चव्हाण यांनी “कविता आनंदाचं अभिधान व विचारांचं अधिष्ठान असते.पुरस्कारांची उंची सांगण्याची गरज नसते पुरस्कृत साहित्यकृती वाचूनच सुजाण वाचकांना स्वानुभूती येते .”असे प्रतिपादन केले. पुढे संवाद साधतांना ते म्हणाले की, “सामाजिक जाणिवांचे भरणपोषण महत्त्वाचे आहे. परंतू आंतरिक जाणिवांचे भरण-पोषण करण्याची साहित्यिकांना नितांत गरज आहे. कविता वाचकांची संवेदनशीलता व वैचारिक जाणीवेची पातळी उन्नत तथा समृद्ध करणारी असली पाहीजे. वाड़मय व्यवहारात पुरस्कारासाठी पुस्तक छापण्याचा प्रकार सर्रास चाललाय. याबद्दल त्यांनी परखड ताशेरे ओढले. साहित्य लेखन, पुरस्कार प्रक्रिया व वाचकांची भूमिका याबद्दल मार्मिक बुस्टर डोस दिले. मातापित्यांच्या निःस्वार्थी व तत्वनिष्ठ सामाजिक व राजकीय कार्याच्या वारस्याचं रुपांतर व्रत म्हणून डॉ.विवेक चौधरी व पुरुजीत चौधरी राम लक्ष्मणाप्रमाणे कर्तव्यनिष्ठेने निरंतर आचरण करीत पुढे नेत आहेत असे त्यानी सांगितले.

याप्रसंगी कादंबरी पुरस्कारार्थी संतोष जगताप आपल्या मनोगतात म्हणाले, “स्वर्गीय दिवाकर चौधरी यांनी आपल्या बोलीला आपण मानाचं स्थान दिलं पाहिजे यासाठी सदैव आग्रही होते आणि हा आग्रह त्यांनी लेवा गणबोलीतून लिहून व्रतस्थपणे पाळला. डांभूर्णीसारख्या छोट्या गावाशी आपली नाळ कायम जपत केवळ लिहून न थांबता सामान्य माणसांच्या आणि बळीराजांच्या भल्यासाठी प्रत्यक्ष चळवळीत जगणारे ते कृतिशील क्रांतदर्शी संवेदनशील लेखक होते.” असे सांगत “व्यवस्थेत हस्तक्षेप घडत राहतो तो घडवण्यासाठीच साहित्यिकांनी निर्भयपणे प्रबोधनात्मक निरंतर लिहित जावे. सामान्य शेतकऱ्यांच्या भोवती समस्यांचा विळखा दिवसोंदिवस घट्ट होत गेल्याने त्याच्या शेतीचा श्वास दिवसोंदिवस गुदमरतो आहे . ” असे प्रतिपादन संतोष जगताप यांनी केले. लिहिणे माझा छंद नाही हे विनयाने सांगत लेखन भूमिका मांडतांना ते पुढे म्हणाले,” लिहणं म्हणजे मेंदूत छळणार्‍या प्रश्नांची उत्तरे हुडकून समकालीन भवतालं समजून घेत मानवी वृत्ती – प्रवृत्तींचं आकलन मांडणे .” शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्या व हवामान बदलांचे गंभीर परिणाम सांगून जगतापांनी उपस्थितांची मने जिंकली .

मान्यवरांची उपस्थिती –

निवृत्त प्राचार्य एस.एस .राणे , महाराष्ट्र साहित्य परिषद जळगाव शाखाध्यक्ष प्रा.डॉ.शिरीष पाटील, कवी प्रकाश किनगावकर, अशोक कोतवाल, बाल साहित्यिका सौ .माया धुप्पड, सौ.सरला सोनवणे, सौ.सुषमा सोनवणे, सृजनशील चित्रकार राजू बाविस्कर, प्रा.डॉ.सत्यजित साळवे, प्रा .महेंद्र ,सोनवणे, डॉ.श्रीधर पाटील, सोमनाथ वायकोळे, अभय चौधरी, डिगंबर महाजन, पत्रकार तुषार वाघुळदे, भारतरत्न डॉ.ए .पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव जिल्हा प्रमुख विजय लुल्हे, प्रकाश पाटील, अरुणकुमार जोशी, गणेश सुर्यवंशी, प्रफुल्ल पाटील यांच्यासह मान्यवर रसिक कार्यक्रमास उपस्थित होते.

समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात निवृत्त हिंदीचे प्राध्यापक ए.बी.पाटील यांनी स्व.दिवाकर चौधरी यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची लोकप्रियता सांगत कौटुंबिक गौरवास्पद सुखद घटनांना उजाळा दिला . चंद्रकांत चव्हाण सरांनी मार्गदर्शनात सुगम भाषाशैलीत सकस साहित्य , पुरस्काराची सदोष प्रक्रिया , वाचकांची अभिरुचीवर प्रारंभी परखड भाष्य केल्याने पुढील सर्व मान्यवरांनी सुद्धा याबाबत निक्षून मते मांडल्याने लेखन वाचन कार्यशाळा झाल्याचा रसिकांना सुखद प्रत्यय आला . चंदकांत चव्हाण सरांचे भाषण म्हणजे लेखन वाचन कार्यशाळेचे बीजभाषण असल्याची नांदीच होती ! कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरेश्वर सोनार यांनी तर आभार प्रदर्शन पुरुजीत चौधरी यांनी केले.

Exit mobile version