Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुप्रीम कॉलनीत सोमवारपासून मिळणार नळ-जोडणी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुप्रीम कॉलनी भागात अमृत योजनेचे पाणी पोहचले असले तरी अद्याप तेथील नागरिकांना नळ जोडणी मिळालेली नसल्याच्या पार्श्‍वभूमिवर आज महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी या परिसराला भेट दिली. त्यांनी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेत सोमवारपासून येथे नळ जोडणी मिळणार असल्याचे सांगितले. तर येथील अन्य विकासकामांना वेग देण्यात येणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.

महापालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक १९ मध्ये असणार्‍या सुप्रीम कॉलनी परिसरासाठी मार्च महिन्यातच सुप्रीम कॉलनी भागात अमृत योजनेचे काम पूर्ण झाले असले तरी येथील नागरिकांना अद्याप पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर ला आज महापौर सौ. जयश्री सुनील महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. यात लोकांनी पाण्यासाठी खूप प्रयत्न करून देखील नळ जोडणी मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या. तसेच या परिसरात रस्ते, गटारी आदींसारख्या अनेक मुलभूत समस्या भेडसावत असल्याचेही लोकांनी सांगितले.

महापौर आणि उपमहापौरांनी लोकांच्या या समस्या जाणून घेत, याचे निराकरण करण्याची ग्वाही दिली. तर नळ जोडणीबाबत संबंधीत विभागातील अधिकार्‍यांशी चर्चा करून सोमवारपासून या भागातील नागरिकांना नळ कनेक्शन देण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, या संदर्भात बोलतांना उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले की प्रभाग क्रमांक १९ मध्ये आजवर असलेल्या विकासाचा अनुशेष आम्ही भरून काढणार आहोत. येथे आधीपासून काही लोकांकडे नळ जोडणी होती. तर काहींकडे नव्हती. मात्र अमृत योजना पूर्ण होऊनही येथे पिण्याचे पाणी मिळत नव्हते. मात्र आता सोमवारपासून नळ जोडणी देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तर पावसाळा संपल्यानंतर या परिसरात रस्ते, गटारी आदींसह अन्य कामांना प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती सुध्दा उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिली.

तर, महापौरांनी या भागातील जनतेच्या विकासासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच कामांना सुरूवात होणार असल्याची माहिती दिली. तसेच, या भागात असणारी प्रमुख समस्या म्हणजे पिण्याची पाणी असून याचे निराकरण लवकरच करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली.

 

Exit mobile version