Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आता संजय राऊतांवर आरोप !; महिलेने दाखल केली याचिका

मुंबई प्रतिनिधी । मंत्री संजय राठोड यांचे प्रकरण शांत होत नाही तोच शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत हे गोत्यात आले आहेत. राऊत हे आपल्यावर पाळत ठेवत असून त्यांच्या माणसांनी दोनदा हल्ला केल्याचा आरोप करत एका महिलेने न्यायालयात याचिका दाखल केल्याचे खळबळ उडाली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात एका महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संजय राऊत गेले कित्येक वर्षे पाळत ठेवून आहेत. त्यांच्या माणसांनी आपल्यावर दोनदा हल्ला केला. तसेच राऊत यांनी आपले फोन टॅप केले, असे आरोप संबंधित महिलेने याचिकेद्वारे केले आहेत. याबाबतचे वृत्त हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे.

या वृत्तात म्हटले आहे की, याचिकाकर्त्या या सायकॉलॉजिस्ट, लेखक आहेत. त्यांनी केलेल्या याचिकेनुसार, संजय राऊत यांची माणसे गेले कित्येक वर्षे त्यांच्यावर पाळत ठेवून आहेत. तसेच राऊत यांच्या माणसांनी दोनदा त्यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांना मदत करणार्‍या लोकांना धमकावून किंवा त्यांच्यावर दबाव टाकून त्यांच्यापासून दूर केले. इतकेच नव्हे तर त्यांच्या पतीच्या मदतीने त्यांची छळवणूकही केली.

या सर्व प्रकाराबद्दल २०१३ मध्ये माहीम पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. मात्र, त्यांनी तपास केला नाही. तर दुसर्‍यांदा करण्यात आलेल्या हल्ल्याबाबत वाकोला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली. त्याचाही तपास नीट करण्यात आला नाही. या सर्व कालावधीत आपल्या खासगी आयुष्य जगण्याच्या अधिकारावर गदा आणण्यात आली. असा आरोप संबंधीत महिलेने केला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करत आहेत. त्यामुळे वाकोला पोलिसांना नोंदवलेल्या तक्रारीवर तपास करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्तीने याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने ४ मार्च रोजी ठेवली आहे.

Exit mobile version