Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘व्यक्तिमत्व’ म्हणजे माणसाचा सर्वांगीण विकास – राजकुमार कांकरिया

जळगाव प्रतिनिधी । ‘व्यक्तिमत्व’ म्हणजे माणसाचा सर्वांगीण विकास होय, या सर्वांगीण विकासामध्ये शारीरिक व मानसिक सदृढता महत्त्वाची असते. आत्मविश्वासाच्या माध्यमातून व्यक्ती हा सदृढ बनत असतो व व्यक्तिमत्व विकासाचा पहिला प्रभाव म्हणजे त्याची शरीरयष्टी. त्याचे दिसणे, त्याचे वागणे, चालणे, बोलणे या बाबी जास्तीत जास्त विकसित व्हायला हव्यात. व्यक्तिमत्व विकासात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे नेतृत्वगुण, एकात्मता व बंधुभाव असे प्रतिपादन सीएस प्रा. राजकुमार कांकरिया यांनी जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयामधील प्रथम वर्ष एमबीए व एमसीए या विभागाच्या इंडक्शन कार्यक्रमावेळी व्यक्त केले.

याप्रसंगी रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, इस्टीट्यूटचे अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, एमबीए विभागप्रमुख प्रा. मकरंद वाठ व एमसीए विभागप्रमुख प्रा.रफिक शेख हे व्यासपीठावर उपस्थित होते. आपल्या मनोगत कार्यक्रमात पुढे बोलताना प्रा. कांकरिया म्हणाले की, स्वतःला समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी स्वतःमध्ये काय चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेत याची एक यादी करा.

त्यानंतर त्यातील चांगल्या गोष्टी प्रत्येक आठवड्याला वाढवण्याचा प्रयत्न करा. सोबत वाईट गोष्टींवर मात करीत एक प्रभावी, तजेलदार व्यक्तिमत्त्व घडवा तसेच तुमच्या वागण्या-बोलण्यातून सकारात्मक भाव समोरच्या व्यक्तीवर प्रतित व्हायला हवा. तुम्ही नकारात्मक असाल, किंवा काही कारणांनी नाराज असाल तर समोरच्या व्यक्तीवर तुमचा प्रभाव पडणार नाही. तो व्यक्ती तुम्हाला टाळायचा प्रयत्न करेल. अशा वेळी तुम्ही तुमचे मुद्दे त्याला पटवून सांगू शकत नाहीत. त्यामुळे सकारात्मक भाव फार महत्वाचे असतात समोरचा व्यक्ती काय सांगतोय, हे ही तुम्ही लक्ष देऊन ऐकायला हवे. जसे तुम्ही चांगला वक्ता असावेत तसेच चांगला श्रोता असणेही महत्वाचे आहे.

अन्यथा समोरचे व्यक्ती तुम्हाला ऐकून ऐकून बोर होतात. तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतात. समोरच्या व्यक्तिशी संवाद साधताना, बोलताना अगदी कंम्फरटेबल राहा. तुमच्या बॉडिलॅंग्वेजवर भर द्या. त्यातून तुम्ही प्रभावी संभाषण साधू शकता. आपले मुद्दे पटवून देऊ शकता. भाषण करतानाही बॉडी लॅंग्वेजला खुप महत्त्व आहे. एखाद्या इव्हेंटनुसार आपले ड्रेसिंग ठेवा. ऑफिसला जाताना साजेशे कपडे घाला. रात्रीची पार्टी असेल तर पार्टी लुकमध्ये जरा मॉर्डन दिसण्याचा प्रयत्न करा. कलिग्जसोबत बाहेर फिरायला जाणार असाल तर कॅज्युअल्स घाला.

आत्मपरिक्षण अत्यंत आवश्यक आहे. त्यातून तुमच्या चांगल्या वाईट बाबी समोर येत असतात. तुम्ही खरंच चुकताय की बरोबर आहात, हे तुम्हाला समजून येते. तुम्ही मार्गक्रमण करीत असलेला मार्ग योग्य की दुसरा मार्ग पकडायला हवा, हेही समजते. आत्मविश्वास असायलाच हवा. आपल्या गुणांची आपल्याला पारख हवीच. पण ओव्हर कॉन्फिडन्ट राहू नका. त्यात तुमचे नुकसान असते. पण स्वतःला दुर्लक्षितही करु नका. अन्यथा तुमच्या गट्स असतानाही तुम्ही स्पर्धेच्या बाहेर फेकले जाता. सर्वोत्तम राहण्याची क्षमता असतानाही मागच्या रांगेत उभे राहता. तेव्हा बी कॉन्फिडन्ट. जगावर मात करा असे आवाहन करीत प्रा. राजकुमार कांकरिया यांनी यावेळी विविध मॅनेजमेट गेमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राहुल त्रिवेदी व आभार प्रा. योगिता पाटील यांनी मानले तसेच यावेळी प्रा. कल्याणी नेवे, प्रा. प्रशांत देशमुख व आदी उपस्थित होते.

 

Exit mobile version