माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्यास जनता मोदींना जबाबदार धरेल : अण्णा हजारे

अहमदनगर (वृत्तसंस्था ) आपल्या जीवाला बरं वाईट झाल्यास जनता पंतप्रधान मोदींनाच जबाबदार धरेल, असे वक्तव्य ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी पुन्हा एकदा अण्णांनी मोदींवर निशाणा साधला आहे. लोकपाल, लोकायुक्तची अंमलबजावणी व्हावी, स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी अण्णांनी उपोषण सुरु केले आहे.


1 जानेवारीला अण्णांनी मोदींना पाठवलेलं पत्र मिळाले असल्याचे पत्र पंतप्रधान कार्यालयाकडून अण्णांना पाठवण्यात आले आहे. मात्र, या पत्रात अण्णांच्या मागण्यांच्या पूर्ततेविषयी कुठलाच उल्लेख करण्यात आलेला नाही, तेही अण्णांनी यावेळी आवर्जून सांगितले. दरम्यान अण्णा हजारे यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस असल्याने राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत रास्तारोको आंदोलन केले आहे. पारनेर-वाडेगव्हान राज्य मार्गावर राळेगणसिद्धी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात मोठ्या संख्येने गावातील पुरुषांबरोबर महिला आणि शालेय विद्यार्थी देखील सहभागी झाले आहेत. उपोषणाचा चौथा दिवस असूनही सरकार कुठल्याही उपाययोजना करत नसल्याने सरकारचा निषेध ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, राळेगणसिद्धीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. अण्णांच्या वजनात घट झाली असून, साडे तीन किलोने त्यांचे वजन कमी झाले आहे. अण्णांच्या समर्थनात ग्रामस्थांनी थाळी नाद आंदोलनही केले. यात राळेगणमधील महिला, पुरुषांसह लहान मुलांनीही सहभाग नोंदवला.

Add Comment

Protected Content