Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पत्रकार प्रा. जयश्री दाभाडे यांना राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्कार प्रदान

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील सामाजिक कार्यकर्त्या, पत्रकार प्रा. जयश्री दाभाडे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त  राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान गौरव पुरस्कार 2022 जाहीर झाला होता. आज पुणे येथील दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, मानपत्र,सन्मानचिन्ह असे असून मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रा दाभाडे यांना प्रदान करण्यात आला.

या संदर्भात प्रा. जयश्री दाभाडे यांचे नॉमिनेशन मागविण्यात आले होते. देशभरातील खऱ्या अर्थाने तळा गाळातील घटकांसाठी कार्य करत असलेल्या महिलांचा सन्मान या संस्थे मार्फत केला जातो.  प्रा. दाभाडे ह्या सातत्याने वंचित, दलित,आदिवासी, महिला,बालक यांच्या साठी उत्कृष्ट कार्य करत आहेत. त्याच बरोबर पत्रकारिता क्षेत्रात अत्यन्त कमी वेळात आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी ठसा उमटवला आहे. अनेक आंदोलने, उपोषण, अर्ज, निवेदने या मार्फत समाजातील अति सामान्य माणसाच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी प्रशासनाकडून न्याय मिळविला आहे. वेळ प्रसंगी समाजासाठी तुरुंगवास पत्करण्याची देखील त्यांनी तयारी दाखवली आहे. प्रत्यक्ष फिल्ड वर उतरून कार्य करणाऱ्या प्रा दाभाडे यांनी गेल्या 26 वर्षांपासून निस्वार्थीपणे आपले कार्य सुरू ठेवले आहे. आपला वेळ, पैसा, बुद्धिमत्ता इ. समाज, वंचित घटकांसाठी त्यांनी दिला आहे. या सर्व कार्याची दखल आता पर्यंत अनेक अशासकीय,शासकीय पातळीवर घेण्यात आली असून 56 पुरस्कार प्रा. दाभाडे यांना प्राप्त झाले आहेत. आता हा 57 वा मानाचा तुरा त्यांच्या शिरपेचात राज्य पातळीवर दखल घेऊन सन्मानित करण्यात आले आहे.

स्क्रूटिनी समिती मार्फत सर्व माहिती तपासून पाहिल्यानंतर आलेल्या नॉमिनेशन मधून वर्गीकरण करून राज्यातील 13 उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना सन्मान चिन्ह, गौरवपदक, मानाचे महावस्त्र, मानपत्र, मानकरी बॅच, आणि मानाचा फेटा असे स्वरूप या गौरवाचे स्वरूप आहे. प्रा. जयश्री दाभाडे यांना जाहीर झालेल्या  ह्या राज्यस्तरीय पुरस्काराने निश्चितच अमळनेर करांची देखील मान उंचावली असून अमळनेरचे नाव राज्य पातळीवर गेले आहे.

प्रा. दाभाडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

 

Exit mobile version