Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळ्यात निम्म्या शेतकर्‍यांची कापूस खरेदी : अमोल पाटील

पारोळा प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असणारी कापूस खरेदी ही नियमानुसार व पारदर्शकतेने होत असून आजवर सुमारे ५० टक्के खरेदी करण्यात आल्याची माहिती सभापती अमोल चिमणराव पाटील यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन कापूस खरेदीबाबत माहिती दिली. या वेळी उपसभापती दगडू पाटील, संचालक चतुर पाटील, मधुकर पाटील, प्रेमानंद पाटील, बी. एन. पाटील, सुनील पाटील, प्रा. आर. बी. पाटील उपस्थित होते.

याप्रसंगी अमोल पाटील म्हणाले की, पणन महासंघ अंतर्गत तालुक्यात कापूस खरेदी सुरू आहे. अवघ्या पाच दिवसात नोंदणी केलेल्या निम्मे शेतकर्‍यांचा कापूस खरेदी करण्यात आला आहे. मोजणीप्रसंगी काही अडवणूक, अडचणी असतील तर त्या शेतकर्‍यांनी बाजार समितीकडे तोंडी ऐवजी लेखी तक्रार करावी. त्या तक्रारीचे निरसन करण्यात येईल.

पाटील पुढे म्हणाले की, तालुक्यात २८ नोव्हेंबरपासून तीन वेगवेगळ्या केंद्रावर हमी भावाने कापूस खरेदी सुरू आहे. या खरेदीसाठी आजपर्यंत ५ हजार ५०० शेतकर्‍यांनी नावनोंदणी केली आहे. नोंदणी क्रमांकानुसार बाजार समितीतर्फे शेतकर्‍यांना फोन करून कापूस आणण्याची पूर्व सूचना दिली जात आहे. त्यानुसार सुमारे साडेचारशे शेतकर्‍यांचा कापूस रोज मोजला जात आहे. आतापर्यंत २ हजार ३०० शेतकर्‍यांचा २ हजार २५० वाहनांतून आलेल्या ३५ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. ज्या शेतकर्‍यांनी अद्याप नावनोंदणी केली नसेल, त्यांनी नाव नोंदणी करून घ्यावी.

Exit mobile version