Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोणतीही सूचना न देतांना घरांवर चालवला जेसीबी : दळवेलकर संतप्त

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दळवेल येथील काही घरांच्या भूसंपादनाचा निर्णय प्रलंबीत असतांनाही प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता घरे पाडल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

दळवेल गावातील एकूण ८७ मिळकती या महामार्गामुळे बाधित झाल्या आहेत. यातील २७ घरे ही पक्की बांधकामे आहेत. तर उर्वरीत बखळ जागा आहेत. या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी १० ऑक्टोबर २०१७ रोजी ग्रामस्थ, खासदार आणि लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेतली होती. या बैठकीत प्रत्यक मोजणी करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार ८७ पैकी २७ पक्क्या घरांचे मूल्यांकन करण्यात आले होते.

दरम्यान, या मोबदल्याची प्रतिक्षा असताना महामार्ग प्राधिकरणाकडून अचानक ही घरे अतिक्रमण असल्याची नोटीस देत ७ जानेवारी रोजी घरे पाडण्यात आली. यासाठी संबंधीत ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारची पूर्वसुचना न देता त्यांची घरे पाडण्यात आल्याने भर थंडीत ही कुटुंबे अक्षरश: उघड्यावर आली आहेत. गेल्या सहा वर्षांपासून जिल्हा प्रशासन, महामार्ग प्राधिकरणाने ग्रामपंचायतीच्या हद्दीतील या घरांचे सर्वेक्षण, मूल्यांकन केले होते. ग्रामपंचायतीच्या ‘आठ अ’ उतार्‍यावर त्या मालमत्ताधारकांची मालकी आणि त्याचा मोबदला निश्‍चित करण्यात आला. ही प्रक्रिया सुरू असताना प्राधिकरणाने या मालमत्ता बेकायदेशीर ठरवल्यने संबंधीत ग्रामस्थ प्रचंड संतापले आहेत. या संदर्भात आज सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Exit mobile version